नवी दिल्लीः राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येवरून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नवा दावा करत वादाला तोंड फोडलंय. गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला काँग्रेसच्या माजी कार्यकर्त्याने रिव्हॉल्वर पुरवलं होतं, असं स्वामी म्हणालेत.

स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येवरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्ह आहे. याला कारण आहे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला दावा. महात्मा गांधींच्या हत्येबद्दलचं एक वास्तव जनतेला माहित नाहीए. गांधींच्या हत्या प्रकरणात बडगे हा आणखी एक आरोपी होता. आणि त्यानेच नथुराम गोडसेला रिव्हॉल्वर पुरवलं होतं. कोर्टात बडगेने ही कबुली दिली होती. आरोपी बडगे हा आधी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. नंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तो हिंदू महासभेचा सदस्य झाला होता, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय.
स्वामी गांधींच्या हत्येसंदर्भात दोन ट्विट केलेत. दुसऱ्या ट्विटमध्ये स्वामी यांनी हत्येसंदर्भात चार प्रश्न उपस्थित केलेत. ते पुढील प्रमाणे….
प्रश्न १ – गांधीजींच्या मृतदेहाचे विच्छेदन का झाले नाही?
प्रश्न २ – प्रत्यक्ष साक्षीदार असूनही आभा आणि मनू यांची साक्ष कोर्टात का नोंदवली गेली नाही?
प्रश्न ३ – नथुराम गोडसेच्या रिव्हॉल्वरमधील किती चेंबर्स रिकामे होते?
आणि
प्रश्न ४ – गोडसेकडे इटालियन बनावटीची रिव्हॉल्वर कुठून आली? आणि नंतर ते रिव्हॉल्वर कशी काय गायब झाली? यामुळे गांधी हत्या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडून नव्याने चौकशी गरज आहे, असं स्वामींनी म्हटलंय.

अधिक वाचा  'जय भीम' ठरला ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्या ट्विटवरून सोशल मीडियावर पुन्हा आरोप-प्रत्यरोपांचे सत्र सुरू झाले आहे. अनेकांनी स्वामींवर टीका केलीय. तर काहींनी स्वामींचं समर्थन करत काँग्रेसवर संशय व्यक्त केलाय.