भामरागड: गडचिरोली पोलीस दलातील कमांडो पथकानं नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात बेधडक कारवाई करून एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातलं. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील अबुजमाड जंगलात ही कारवाई करण्यात आली. नक्षलवाद्यांनी सुरुवातीला कमांडो पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल कमांडोंनी केलेल्या कारवाईत एका नक्षलवाद्याला ठार केलं. जवानांनी जीवाची पर्वा न करता, २०० ते ३०० नक्षलवाद्यांना पिटाळून लावलं.
भामरागड परिसरातील लाहेरी हद्दीपासून ४० किलोमीटरवरील नक्षल्यांचा गड असलेल्या अबुजमाड जंगल परिसरात नक्षल्यांकडून हल्ल्याची योजना आखण्यासाठी तळ उभारण्यात आला आहे. या तळावर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलातील सी-६० कमांडो पथकानं अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वाखाली बेधडक कारवाई केली. नक्षलवाद्यांचा म्होरक्या सोनू उर्फ भूपती यानं हे तळ उभारलं होतं. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी एके ४७ आणि एलएमजी आदी अत्याधुनिक रायफलनं कमांडोंवर बेछुट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत एक नक्षलवादी ठार झाला. त्यानंतर जवानांवर गोळीबार करून ठार झालेल्या नक्षल्याचा मृतदेह घेऊन नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला.
पुलवामावरून वातावरण तापले
इतकंच नाही तर, या मोहिमेवरून परतत असताना, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील घमंडी आणि लाहेरीपासून ४० किलोमीटरवर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात कमांडोंवर हल्ला चढवला. तो कमांडो पथकानं परतवून लावला. या हल्ल्यात एक गोळी एका कमांडोच्या लागली. यात तो जखमी झाला. जीवाची पर्वा न करता कमांडो पथकानं प्रत्युत्तर दिलं. अखेर २०० ते ३०० च्या संख्येनं असलेले नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पळून गेले. कमांडो पथकाच्या अतुलनीय शौर्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी कमांडो पथकाची पाठ थोपटली आहे. तसंच या पथकाचं नेतृत्व करत असलेल्या अपर पोलीस अधीक्षक बन्सल यांचंही कौतुक केलं.

अधिक वाचा  'राज्यातील प्रश्नावर एकदा तरी लिहिलं का?' फक्त राजकारण करायला..., रोहित पवार