वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24-25 फेब्रुवारी या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात अहमदाबादमध्ये ‘केम छो ट्रम्प’च्या व्यासपीठावर त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. चालू महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासंबंधी अत्यंत उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत स्वतःच्या विशेष अतिथीचे संस्मरणीय स्वागत करणार असल्याची प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या भारत दौऱ्यावरून आम्ही अत्यंत आनंदी आहोत. त्यांचा हा दौरा अत्यंत विशेष असून यातून भारत-अमेरिकेची मैत्री अधिकच दृढ होणार आहे. विविध मुद्दयांवर भारत अमेरिकेला सहकार्य करत आहे. दोन्ही देशांमधील बळकट होणाऱ्या मैत्रीमुळे जगाला लाभ होणार असल्याचे मोदींनी ट्‌विट करत म्हटले आहे.
उत्तम संबंधांच्या अपेक्षेसह भारतात जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र असून एक उत्तम व्यक्ती देखील आहेत, असे ट्रम्प यांनी नमूद केले आहे. आगामी दौऱ्यात भारतासोबत प्रभावी व्यापार करार केला जाणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचा अध्यक्ष म्हणून भारताचा हा पहिलाच दौरा आहे. 2010 आणि 2015 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी दौरा केला होता.

अधिक वाचा  नितेश राणेंना पुन्हा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

कडेकोट बंदोबस्त

ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरदार पटेल मोतेरा क्रिकेट स्टेडियमची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 300 पोलीस आणि अधिकाऱ्यांसह एनएसजी आणि एसपीजी जवान तैनात राहणार आहेत. एसपीजी महासंचालक राजीव रंजन भगत यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी अहमदाबाद येथे पोहोचणार आहेत. चालू आठवडयातच भक्कम सुरक्षेची योजना आखण्यात येईल.

मेलानियांना मिळणार अनेक भेटवस्तू

ट्रम्प यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांच्या पत्नी मेलानिया यांना गुजरात सरकारकडून संस्कृती आणि कलाकुसर दर्शविणाऱ्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. यात पाटणची पटोदा, जामनगरमधील विशेष स्कार्फ तसेच कच्छी भरतकाम असलेला रुमाल प्रदान केला जाणार आहे. याचप्रकारे ट्रम्प यांना भरतकाम केलेले जॅकेट तसेच पोशाख देण्यात येणार आहे. सोने आणि हस्तिदंताने निर्माण करण्यात आलेले एक बास्केट आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृतीही प्रदान करण्यात येईल.