पुणे: केंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने राज्यातील अनेक रस्त्यांच्या भारंभार घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी लागणारा निधी न दिल्यामुळे सध्याच्या घडीला अनेक रस्त्यांची कामे खोळंबल्याचे त्यांनी म्हटले.
गेल्या वर्ष-दीड वर्षात केंद्र सरकारकडून निधी येत नसल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे थंडावली आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या कामांसाठी आवश्यक तो निधी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. रस्त्यांची कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी अशोक चव्हाण यांनी खेड शिवापूरच्या आंदोलनासंदर्भातही भाष्य केले. खेड शिवापूरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्ता आहे. केंद्र सरकारचा हा रस्ता टोलवर आधारीत करारानुसार तयार झाला आहे. टोल नाक्यासंदर्भात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये विसंगती दिसून येते. या टोल नाक्याला विरोध होता तर भाजपने या रस्त्याचे बांधकाम सुरु असतानाच आपली भूमिका मांडायला हवी होती, असे चव्हाण यांनी सांगितले.

अधिक वाचा  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना देणार कानमंत्र