पुणे – प्रेम व्यक्‍त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. हा मुहूर्त साधत तब्बल 82 प्रेमीयुगुलांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. दि.14 फेब्रुवारी या दिवशी लग्न करण्यासाठी सुमारे दीड महिन्यांपूर्वीच पूर्व नोंदणी शहर विवाह नोंदणी कार्यालयात केली होती. शुक्रवारी फोटोझिंको येथील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी मोठी गर्दी होती. एका दिवसात नोंदणी पद्धतीने या कार्यालयामध्ये सरासरी 20 ते 22 विवाह नोंदविले जातात.

‘व्हॅलेंटाइन डे’ जल्लोषात
दरम्यान,’व्हॅलेंटाइन डे’ला ‘वर्किंग डे’ असल्याने बहुतांश जणांनी ‘सेलिब्रेशन’ संध्याकाळी करण्याला पसंती दिली. केवळ प्रेमी जोडप्यांनीच नव्हे तर, मित्र-मैत्रिणी आणि खास व्यक्‍तींबरोबर ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला. फर्गसन रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्क आदींसह वेगवेगळे मॉल्स ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सजले होते.
गुलाबाची फुले, फुगे, मास्क आदींनी सजावट केली होती. तर विविध दुकानांमध्ये गिफ्टस, ड्रेसेस, ज्वेलरी आदींवर आकर्षक सवलतीदेखील दिल्या होत्या. रस्त्यांवरदेखील ‘हार्ट’ आकाराच्या फुग्यांची विक्री होत असल्याने, रस्तेदेखील गुलाबी झाले होते. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्‍त करण्याच्या पद्घतींत बदल झाला आहे. त्यामुळे ग्रीटिंग कार्ड, पुष्पगुच्छ न देताच संदेश देवाण-घेवाण करत प्रेम व्यक्‍त केले जात आहे. त्याचा परिणाम जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अधिक वाचा  प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी कडेकोट पहारा