पुणे दि. 15 – खैराव (ता. माढा) येथे होणा-या सोळाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संघटक व संमेलनाचे संयोजक फुलचंद नागटिळक यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संमेलनाचे आय़ोजन केले जाते. श्री यादव हे सध्या गाजत असलेल्या वारीच्या वाटेवर या महाकांदबरीचे लेखक आहेत. उन्हातला पाऊस, शिवधर्मगाथा, यादवकालीन भुलेश्वर, सुतसंस्कृती, घुंगुरकधा, मातकट, गुंठामंत्री, पोवाडा पुरुषोत्तमाचा, लेखणीची फुले, बालाघाटचा सिंह, गाणी शरद पवारांची, साहित्यभूषण छत्रपती संभाजी महाराज, सत्यशोधक दिनकरराव जवळकर, आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ढोलकीच्या तालावर सिनेमासाठी गीत लेखन केले असून, रणांगण सिनेमाचे संवाद व पटकथा त्यांची आहे. महिमा भुलेश्वराचा (गीत अल्बम) सत्याची वारी (व्हीडीओ पटाचे लेखन), दिंडी निघाली पंढरीला व गुंठामंत्री (सिनेमाची कथा) त्यांनी लिहिली आहे. चाकोरी बाहेरची प्रेमकथा असलेल्या फाटक या मराठी चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद आणि गाणी त्यांचीच आहेत. पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून, पुणे युथ प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. बेळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिशाल विभागात व्याख्याता म्हणून ते कार्यरत आहेत. पुण्यात दैनिक पुढारी, लोकमत, नवशक्ती मध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले आहे. दैनिक सकाळमध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी काम केले. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्ता, गीतकार असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. पुरंदर तालुक्यातील माळशिरस (भुलेश्वर) हे त्यांचे मूळगाव. क-हा काठावरच त्यांचा साहित्याचा वटवृक्ष बहरला. पुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा समाजामध्ये रुजविण्यासाठी त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. सासवड येथे २०१४ साली झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते प्रवक्ते होते. सुकाणू समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिले.

अधिक वाचा  महापालिकेच्या शाळा इमारत खासगी संस्थांना देण्याचा डाव फसला; राजकीय मंडळींना चपराक

श्री यादव यांना छत्रपती संभाजीराजे साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दलितमित्र, राज्यस्तरीय युवा पत्रकार रत्न, महाराष्ट्र साहित्यरत्न कला गौरव पुरस्कार, डाँ बाबासाहेब आंबेडकर साहित्य भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोप-यातील लेखक, कवींना साहित्यचळवळीतून प्रोत्साहन दिले. बारामती येथे झालेल्या लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, खानवडी (ता.पुरंदर) येथे झालेल्या दहाव्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले आहे. तसेच ठाणे येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

अधिक वाचा  पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांचा भाजपला रामराम; बंडाचे निशाण फडकावले

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापुर्वी प्रकाश गव्हाणे, सुरेश पाठक, मुकुंदराज कुलकर्णी, उध्दव कानडे, इंद्रजित भालेराव, राजेंद्र दास, डाँ. कृष्णा इंगवले, प्रशांत जोशी, श्रीकांत मोरे, शिवाजी चाळक, लक्ष्मीनायण बोल्ली,सुवर्णा गुंड व शरद गोरे यांनी भुषविले आहे असेही श्री नागटिळक यांनी सांगितले.