भूज ;मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी एका कॉलेजने ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरात येथील भूजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवली आहेत. मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासले. या पकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे. अहमदाबाद मिररने या संदर्भतले वृत्त दिले आहे.
गुजरातच्या भूजमध्ये एक संस्था चालवण्यात येते. २०१२ मध्ये या कॉलेजची सुरुवात करण्यात आली. २०१४ मध्ये या कॉलेजची नवी इमारत बांधण्यात आली. या महाविद्यालयात बी कॉम, बीए आणि बीएससीचे पदवी अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. प्रशासनाच्या नियमांनुसार जेव्हा मुलींची मासिक पाळी सुरु असते तेव्हा कॉलेजमधील धार्मिक स्थळ आणि हॉस्टेलच्या स्वयंपाकघरात बंदी असते. अशा वेळी मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनींनी कुणालाही स्पर्शही करायचा नाही असेही या नियमात म्हटलं गेलं आहे. गुरुवारी हॉस्टेलच्या अधिक्षिका अंजलीबेन यांनी कॉलेजच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर मुलींना वर्गातून बाहेर काढण्यात आले. कुणाची मासिक पाळी सुरु आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दोन मुलींनी हात वरती केले. त्यांना बाजूला काढण्यात आले. त्यानंतर ६८ मुलींना स्वच्छतागृहात नेण्यात आले. तिथे त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यात आली.
महाविद्यालय प्रशासनाला वाटलं की मुलींकडून मासिक पाळी संदर्भात घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन होतं आहे. त्यामुळे ही तपासणी करण्यात आली. गुरुवारी झालेल्या प्रकारानंतर ६८ मुलींनी आंदोलन केलं आणि संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना हा धार्मिक मुद्दा आहे त्यामुळे हे प्रकरण इथेच संपवा असे सांगितले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. मात्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे असंही या वृत्तात म्हटलं आहे.

अधिक वाचा  नाना पाटेकर यांनी केली अजित पवारांची प्रशंसा.. म्हणाले,