“सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होते,” या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
2 जानेवारी 2020ला नवी मुंबईतल्या उरण येथे इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं.
त्यात त्यांनी म्हटलं, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.”
इंदुरीकर महारांजांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलंय असं नाही. त्यांनी आपल्या किर्तनांत अनेकदा हे वक्तव्य केलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेलदमध्ये फेब्रुवारी 2019मध्ये केलेल्या किर्तनात त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं.
याच किर्तनात त्यांनी पुढे हेसुद्धा म्हटलंय की, “सोमवारी, एकादशीला स्त्री संग करणाऱ्या माणसाला क्षयरोग होतो.”
इंदुरीकरांना नोटीस
इंदुरीकर महाराजांच्या वरील वक्तव्यामुळे त्यांना अहमदनरगच्या PCPNDT समितीनं नोटीस पाठवली आहे.
अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी बीबीसीला सांगितलं, “आपलं महानगर या वर्तमानपत्रात इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची बातमी आली होती. सम दिवशी समागम केल्यास मुलगा होतो, विषम दिवशी समागम केल्यास मुलगी होते. उजवीकडे फिरला तर मुलगा होतो, डावीकडे फिरला तर मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केल्याचं त्या बातमीत म्हटलं आहे. कोणत्याही पद्धतीनं लिंगनिदानाबद्दल वक्तव्य करणं किंवा जाहिरात करणं प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याच्या (PCPNDT) 22 व्या कलमाचं उल्लंघन ठरतं. त्यामुळे पुण्यातल्या वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार इंदुरीकरांना बुधवारी (12 फेब्रुवारी) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “वर्तमानपत्रात आलेल्या बातमीविषयी आपलं काय म्हणणं आहे, याविषयी तत्काळ उत्तर द्या, असं त्या नोटिशीत म्हटलं आहे. त्यामुळे इंदुरीकरांनी आज उत्तर देणं अपेक्षित आहे. सध्यातरी त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाहीये. त्यांनी उत्तर न दिल्यास पुण्यातील PCPNDTच्या वरिष्ठ कार्यालयाच्या ज्या सूचना येतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ.”
इंदुरीकर महाराजांचं म्हणणं काय?
इंदुरीकर महाराजांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांचे निकटवर्तीय आणि वकील पांडुरंग शिवलीकर यांच्याशी संपर्क साधला.
ते म्हणाले, “इंदुरीकर महाराजांना अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. ज्या वक्तव्यावरून चर्चा सुरू आहे, त्याचा तेवढाच भाग कापून यूट्यूबवर टाकण्यात आला आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ काय हे मात्र त्यात दाखवण्यात आलेलं नाही. त्यासाठी संपूर्ण किर्तन पाहायला हवं.”
इंदुरीकरांचं या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे, याविषयी ते म्हणाले, “आज संध्याकाळपर्यंत याविषयीची आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत. त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायचा आमचा विचार आहे. संध्याकाळपर्यंत थांबा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.”

अधिक वाचा  इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन,संयोजकांविरोधात गुन्हा दाखल