आळंदी देवाची ( दिनेश कुऱ्हाडे ) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या पुण्य अलंकापुरीला गेली अनेक वर्षे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. विविध सामाजिक संघटनांनी पाठपुरावा करून सुद्धा आळंदी शहरातील पाणी प्रश्न सुटला नाही. पाण्यात पिंपरी – चिंचवडमधील घाण इंद्रायणी नदीत सोडली जात आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे पाणी दूषित झाले असून ते फिल्टर होत असले तरी पिण्यायोग्य नाही. संपूर्ण महाराष्ट्रातुन आळंदीत येणारे भाविक तेच तीर्थ म्हणून पाणी पीत आहेत. आळंदी शहरातील दशक्रिया विधीसाठी, आंघोळ करण्यासाठी गावातले लोक पाण्याचा टँकर मागवत आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रात आंघोळ सुद्धा करणे म्हणजे त्वचेच्या आजाराला निमंत्रण देण्यासारखेच आहे, इतके पाणी अशुद्ध झाले आहे. आळंदी शहरात जेवढे ग्रामस्थ राहत आहेत त्याच्या चौपट वारकरी संप्रदायाचे महाराज, विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आळंदीत राहत आहेत. पाणी प्रश्न जेवढा आळंदीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तेवढाच तो वारकरी संप्रदायाच्या आणि माऊलींच्या दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने सुध्दा महत्त्वाचा आहे. सदगुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाला खासदार शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. रामायणचार्य हभप रामराव ढोक महाराज यांनी आळंदी शहरातील इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाच्या संदर्भात सविस्तर माहिती शरद पवार यांना देऊन या प्रकरणी लक्ष घालावे असे आवाहन केले.
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की , “वारकरी संप्रदायाने सांगितलेले कामे पूर्ण करण्याची जबाबदारी ही पवार घराण्यातील जन्मलेल्या व्यक्तींची आहे. मी आश्वासन न देता आपले कर्तव्य म्हणून या प्रकरणी लक्ष घालणार आहे.
पुण्यातील साखर संकुलात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाच्या संदर्भात बैठक बोलावली होती . यावेळी उपस्थित संबंधित असलेल्या अधिकार्‍यांकडून सर्व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 17 फेब्रुवारीला मुंबईत बैठक बोलावली असून यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी नवलकिशोर , पुणे महापालिका आयुक्तशेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग, आमदार दिलीप मोहिते पाटील, आळंदी शहरातील राजकीय पक्षाचे नेते, पत्रकार उपस्थित होते. या बैठकीत पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते, यासर्व विषयी अजित पवार यांची भूमिका फार महत्त्वाची राहणार असून ते कितपत याप्रकरणी लक्ष घालतात हे सुद्धा महत्त्वाचे आहे . वारकरी संप्रदायाच्या मध्यस्थीने आळंदीचा पाणी प्रश्न सुटावा ही सर्व आळंदीकरांची मागणी आहे. परंतु , इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाच्या संदर्भात जेवढी जबाबदारी प्रशासनाची आहे त्यापेक्षा अधिक जबाबदारी ही येथे राहणाऱ्या नागरिकांची सुध्दा आहे. इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि प्रदुषण मुक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

अधिक वाचा  अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भुमिकेवरुन भाजपकडून प्रतिक्रिया “एक अभिनेता म्हणून"....