मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली सामाजिक कार्यकर्ती उर्वशी चुडावाला हिला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. न्या. संदीप शिंदे यांनी अटपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 24 फेब्रुवारी पर्यंत तहकूब ठेवताना उर्वशीला बुधवार दि. 12 आणि 13 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 2 यावेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला हजर राहून सहकार्य करावे असे निर्देश दिले.

तसेच या चौकशी दरम्यान अटक करण्याची वेळ आल्यास 25 हजाराच्या जामीनावर सुटका करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. इमामच्या विरोधात राष्ट्रद्रोहासह अनेक गंभीर गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या समर्थनार्थ आझाद मैदान येथे एलजीबीटीक्‍यू (समलैगिंक-बायसेक्‍शुअल-ट न्सजेन्डर-क्वीर) समाजघटकांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात चुडावाला (22)ने शारजीलच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली. तर
आंदोलनाआधी सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्टही लिहिली असा आरोप पोलिसांनी केला आहे.

अधिक वाचा  वारज्यात मनपाच्या दप्तर दिरंगाईने वाहतूक कोंडी; काँग्रेस योग्य कार्यवाहीसाठी आग्रही

या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये, म्हणून चुडावाला हिने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी दिलासा देण्यास नकार देत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर तिने आज हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर आज न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समोर सुनावणी झाली.

यावेळी उर्वशीच्यावतीने जेष्ट वकील ऍड. मिहिर देसाई यांनी बाजू मांडली. तर राज्य सरकारच्यावतीने ऍड. दीपक ठाकरे यांनी या अर्जाला जोरदार विरोध केला. अभय पक्षांच्या युक्तीवादानंतर उर्वशी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली नसल्याचा ठपका न्यायालयाने ठेवत उर्वशीला 12 आणि 13 फेब्रूवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला समोरे जावे, डबल सिम असलेला मोबाईल फोन, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा. तसेच मुंबई आणि ठाणे जिल्हाच्या बाहेर न्यायालयाच्या परवानगी शिवाय जाऊ नये, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.