नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांचे वर्णन आपचे सबकुछ असे स्थानिक नेते करतात. सरकार, पक्षाचा चेहरा ते असले, तरी निवडणूक प्रचारात चार शिलेदारांनी आपचा किल्ला मजबूत लढविला. मनीष सिसोदिया, आतिशी, गोपाल राय, सौरभ भारद्वाज यांच्याशिवाय आपचे यश अपूर्ण ठरते.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून मनीष सिसोदिया यांचे नेतृत्व पुढे आले. त्यांनीच शाळांचे मॉडेल विकसित केले. पारंपरिक विचारांचा पगडा असूनही त्यांनी कधीही आधुनिक विचारांशी गल्लत केली नाही. मित्रांशी वेदशास्त्रपुराणांवर चर्चा करणारे सिसोदिया कधीही अवैज्ञानिक भूमिका घेत नाहीत. केजरीवाल व मनीष सिसोदिया म्हणजे दोन विचार व एक निर्णय. पक्षांमध्ये असे समीकरण अभावानेच आढळते. भाजपमध्ये हे समीकरण मोदी-शहा जोडीचे आहे.

अधिक वाचा  पुण्यात लवकरच आणखी एका लसीची निर्मिती

आतिशी परदेशात शिकल्यानंतर बड्या कंपनीतील नोकरी सोडून दिल्लीत परतल्या. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाचे माध्यम प्राथमिक, माध्यमिक शाळाच आहेत, हे त्यांनी पक्षाला पटवून दिले. नंतरच शाळांची स्थिती पालटली. गेल्या अडीच-तीन वर्षांत त्यांनी एकही वादग्रस्त विधान केले नाही. परदेशी शिष्टमंडळांना दिल्लीच्या शाळांत आणण्याचे कसबही त्यांनी दाखविले.

गोपाल राय हे पक्षात केजरीवाल व सिसोदियांहून लोकप्रिय आहेत, असे म्हणतात. पक्ष बांधला गोपाल राय यांनीच. त्यामुळेच केजरीवाल यांनी त्यांच्यावर ७० मतदारसंघातून प्रचारयात्रा काढण्याची जबाबदारी सोपविली. नेते-कार्यकर्ते-समर्थक-स्वयंसेवक अशी विभागणी केल्याने पक्षाची मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी झाली.

सरकार व पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणजे सौरभ भारद्वाज. प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याच्या हातोटीमुळे त्यांचे पक्षातील स्थान भक्कम झाले. मतमोजणी सुरू होताच आपकडून टीव्हीवर आले ते भारद्वाजच. उच्चविद्याविभूषित असल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. माध्यमांना न्यूज पुरविण्याची रणनीतीही त्यांनी उत्तम राबविली.