नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल. मात्र, गेल्यावेळच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. याचा थेट फायदा भाजपला मिळाला आहे. तर काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
२०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी ६७ जागांवर ‘आप’ने बाजी मारली होती. तर भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या होत्या. मात्र, यंदा अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक प्रचारामुळे भाजप दोन आकडी संख्या गाठेल, असा जाणकारांचा होरा आहे. त्यामुळे एक्झिट पोलचा हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अधिक वाचा  प्रजासत्ताक दिन: 'बीटिंग द रिट्रीट' सांगता गाण्याचा वाद काय? आता हे गीत वाजणार

तत्पूर्वी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीत तब्बल ५५ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१५ च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास १२ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे आता येत्या ११ तारखेला जाहीर होणारे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

EXIT POLL चे निकाल खालीलप्रमाणे:

झी न्यूज:- आप- ४९, भाजप-२१
जन की बात:- आम आदमी पक्ष-५५, भाजप- १५
टाईम्स नाऊ:- भाजप- २६, आप ४४
न्यूज एक्स-नेता:- आप-५५, भाजप १४, काँग्रेस-१
इंडिया न्यूज नेशन:- आप-५५, भाजप १४, काँग्रेस-१

एबीपी न्यूज- सी व्होटर:- आप- ५६, भाजप-१२, काँग्रेस-२
न्यूज एक्स- पोलस्टार्ट- आप-५६, भाजप-१४
सुदर्शन न्यूज:- भाजप-२६, आप-४२, काँग्रेस-२
इंडिया टीव्ही:- भाजप-२६, आप-४४