मुंबई : मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणारच, असा निर्धार करत माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळल्याशिवाय राहणार नाही, असा दावा फडवणीस यांनी केला.

मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. यावेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. तीन चाकी रिक्षा प्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात. मात्र, याची चाके तिन्ही बाजुला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. आम्ही कोणाचा विश्वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टीकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

अधिक वाचा  वॉर्ड पुर्नरचनेचा अहवाल आज आयोगाकडे सादर होण्याची शक्यता

आताचा सरकारने एकच चांगले काम केले. ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेतले होते आणि विकासकामांसाठी गती वाढवली होती. ते त्यांनी थांबविण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. आमच्यापेक्षा यांच्या अटी जाचक आहेत. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तशा तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत, असे ते म्हणालेत.

आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. आम्ही प्रगतीच्या दिशेने जात होते. आता हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे, अशीही टीका फडणवीस यांनी केली. एवढंच नाही तर शिवस्मारकाचं काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवले आहे, असाही आरोप फडणवीस यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू. आम्ही संघर्षातून पुढे आलो आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. एवढ्या लवकर सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका, असाही खोचक सल्ला फडणवीस यांनी दिला.