नवी दिल्ली: राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधानांना काठीने मारायची भाषा करत असतील तर आम्ही त्यांना अंडी फेकून मारू, असे वक्तव्य ‘रिपाई’चे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राहुल गांधी पंतप्रधानांना काठीने मारायची भाषा करत असतील तर आम्ही त्यांना अंडी फेकून मारू. अशाच वक्तव्यांमुळे अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव झाला. राहुल गांधी हे काँग्रेस पक्ष पोखरत आहेत. त्यामुळे काँग्रेस नष्ट होईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर पुढच्या सहा महिन्यांमध्ये देशातले तरुण पंतप्रधान मोदींना काठीने मारतील, असे वक्तव्य केले होते. साहजिकच यावरून भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले होते. मात्र, राहुल गांधी यांच्या या टीकेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लोकसभेतील भाषणादरम्यान प्रत्युत्तर दिले होते.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा थेट उल्लेख करणे टाळले होते. काँग्रेसचा एक नेता म्हणाला की, सहा महिन्यांत देशातील तरुण मोदींना दांडक्यांनी मारतील. मग मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतःला दांडकाप्रुफ करून घेईन. गेल्या २० वर्षात असभ्य भाषा आणि शिव्यांनी स्वतःला गालीप्रुफ करून घेतलं आहे. आता सहा महिन्यात अशी मेहनत करणार की, माझ्या पाठीला प्रत्येक काठीचा वार सहन करण्याची ताकद मिळेल, असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला होता.

अधिक वाचा  सीटीईटी परीक्षावेळी विद्यार्थी-आयोजक जुंपले; बाचाबाची नंतर थेट हाणामारी