गोव्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी तिथला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी दारू आणि संपत्ती विकत घेण्यावर जास्त कर लावणार असल्याचे घोषित केले. यामुळे गोव्यामध्ये दारू महागणार आहे. यापूर्वीच्या दोन अर्थसंकल्पांमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. या वर्षीच्या अर्थसंकल्पात मात्र सावंत यांनी त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. सावंत यांनी 2013 साली बदलण्यात आलेल्या जमिनींच्या दरांमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतला.

गोवा राज्याच्या तिजोरीमध्ये महसूल गोळा होण्यासाठीचे मार्ग कमी आहेत. मात्र जे मार्ग आहेत त्यातून गळतीचे प्रमाण थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात बिअर आणि हिंदुस्थानात तयार केलेल्या परदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी गोव्यात तयार होणाऱ्या ‘फेणी’ या मद्यावरीलही उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  रवी शास्त्री यांचे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या बचावात मोठे विधान

फेणीची किंमत बाटलीमागे 100 ते 200 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर बिअरची किंमत 5 ते 15 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पब किंवा बारमध्ये जाऊन दारू पिणंही महागणार आहे कारण गोवा सरकारने किरकोळ विक्री करण्यासाठीच्या परवाना शुल्कातही वाढ करण्याचं ठरवलं आहे. उत्पादन शुल्कातील वाढीमुळे गोव्याच्या तिजोरीत 100 कोटी अधिकचे जमा होतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर इतर कर वाढवल्याने गोवा सरकारच्या तिजोरीत 150 कोटी अधिकचे जमा होतील असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

गोव्याचे अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी रेडी रेकनर दरात बदल करण्याचं ठरवलं असून यामुळे गोव्यात घर घेणं आता 20 टक्क्यांनी महागणार आहे. याशिवाय मुद्रांक शुल्कही वाढणार आहे. आम्ही करात किरकोळ वाढ केली असून सामान्य माणसावर यामुळे आर्थिक बोजा पडू नये यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  पुण्यात महसूल विभाग कोरोना काळातही मालामाल ; 21 हजार कोटींचा महसूल जमा

दारूचे दर वाढल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसेल अशी भीती गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने व्यक्त केली आहे. बांधकाम क्षेत्रात आधीच मंदी आहे, त्यात कर-दर वाढवल्याने या क्षेत्राला आणकी फटका बसेल अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे.