अयोध्येतील राम मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये ओबीसी समाजाला स्थान देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीच केली आहे. या ट्रस्टमध्ये दलित समाजातील एका व्यक्तिसह आठ ब्राह्मणांचा समावेश केला आहे. मात्र, या ट्रस्टमध्ये ओबीसी समाजातील एकही व्यक्ती नसल्याने भाजपच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आणि अयोध्या आंदोलनाच्या नेत्या उमा भारती यांनी ट्रस्टमध्ये ओबीसी समाजाला स्थान देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे ट्रस्टमधील सदस्यांची नियुक्ती हा भाजपमध्ये अंतर्गत वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

राम मंदिर ट्रस्टमध्ये ओबीसी समाजातील व्यक्तीचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केल्याने पक्ष त्यांच्या मागणीवर काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे. हे दोन्ही नेते ओबीसी समाजातील असून राम मंदिर आंदोलनात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. देशात ओबीसी समाजाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टमध्ये दलित, ब्राह्मण समाजासह ओबीसींचाही समावेश असावा, असे या नेत्यांनी सांगितले. या ट्रस्टमध्ये आपल्याला जायचे नाही, मात्र ट्रस्टमध्ये ओबीसींचा समावेश असावा, अशी आपली इच्छा असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले. या ट्रस्टमध्ये सरकारने ओबीसींचाही समावेश करून या समाजाचा विचार करावा, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावरून आपण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासोबत आहोत. राम मंदिर आंदोलनात आपल्यासोबत अनेक ओबीसी कार्यकर्ते होते. ओबीसी समाजातील अनेक कार्यकर्ते राम मंदिर आंदोलनाशी जोडले गेले होते, त्यांच्या आंदोलनातील कार्याची दखल सरकराने घ्यावी, अशी मागणी उमा भारती यांनी केली आहे.

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा केली होती. या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असणार आहेत. त्यातील 9 कायमस्वरुपी आणि 6 अस्थायी सदस्य असतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यात ट्रस्टच्या 9 कायमस्वरुपी सदस्यांची नावेही देण्यात आली होती. शिवाय या समितीत दलित समाजातील एका व्यक्तिसह ब्राह्मण समाजातील 8 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ट्रस्टच्या या स्वरुपामुळे राम मंदिर आंदोलनातील भाजपचे ज्येष्ठ नेते नाराज आहेत. सरकारने या ट्रस्टमधून ओबीसी समाजाला डावलल्याची भावना या नेत्यांनी व्यक्त केली आहे. आता भाजपा या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी कशी दूर करणार, आणि ट्रस्टबाबत काय निर्णय घेणार, यावर चर्चा सुरू झाली आहे.