पुणे – केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये पुणे विभागाकरिता नेमके काय मिळाले, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, बुधवारी रेल्वे प्रशासनाकडून ‘पिंक बुक’ प्रसिद्ध करण्यात आले असून पुण्याकरिता एकाही नव्या गाडीची भर पडलेली नाही. तसेच जुन्या प्रकल्पांना देखील पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. यामुळे, दर वर्षीप्रमाणेच यंदाही पुणेकरांना यंदाही डावलल्याचे दिसून येते.
पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचा जुनाच विषय नव्याने चर्चिला गेला असून त्यासाठी 2126 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका नियमाप्रमाणे त्यांना द्यावा लागणारा हिस्सा देत नसल्याने या प्रकल्पावर प्रश्‍नचिन्ह उभा राहिला आहे. पुणे-नाशिक नव्या लोहमार्गाचा जुना विषय पुन्हा चर्चेत आला असून 1212 कोटी रुपयांच्या प्रकल्पाकरिता गतवर्षी केवळ 10 कोटी रुपये पुणे विभागाला वर्ग करण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प देखील रखडणार आहे.

अधिक वाचा  वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून राष्ट्रपती भवनात सेवा करणारा विराट १९ वर्षांनंतर सेवानिवृत्त

बारामती-लोणंद नव्या लोहमार्गासाठी 100 कोटींची तरतूद असून पुणे-मिरज-लोंडा, पुणे-दौंड मार्गांच्या विस्तारीकरणाचा देखील समावेश आहे. हडपसर टर्मिनसच्या कामाकरिता 24 कोटी मंजूर झाले असून त्यापैकी आतापर्यंत केवळ 10 कोटी रुपये रेल्वे मुख्यालयाकडून मिळाले आहेत. मात्र, सध्याची स्थिती पाहता हा निधी अपुरा ठरणारा असून, खासदारांनी पुढाकार घेत पाठपुरावा करण्याची गरज आहे.

पुणे विभागाकरिता तरतूद
पुणे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी 38 कोटींची तरतूद, त्यापैकी केवळ 3 कोटी रुपये मिळाले.
दौंड कॉर्ड लाइनसाठी तरतूद असलेले 19 कोटी रुपये पुणे विभागाकडे वर्ग.
रेल्वे गेट क्रॉसिंगसाठी 12 कोटींची तरतूद, 4 कोटी पुणे विभागाकडे वर्ग.
प्रवासी सुविधांसाठी 2 कोटींची तरतूद