नवी दिल्ली : राज्यचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये भाजपकडून महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागेवरील उमेदवारीवर चर्चा झाली. यात माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर अमित शहा आणि फडणवीस यांच्यात सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यसभेच्या सात जागांची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील संसद भवनात अमित शहांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीत महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यात आली. त्यात उदयनराजे भोसले यांच्या नावावर सहमती असल्याचे बोलले जात आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

अधिक वाचा  'जय भीम' ठरला ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ऍड. माजिद मेमन, कॉंग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने आघाडीचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. मात्र निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्यास सातव्या जागेसाठी सामना रंगणार आहे.