नवी दिल्ली : निवडणूक पूर्व सर्वेक्षणाच्या अंतीम टप्प्यात सी व्होटर यांनी घेतलेल्या मतदानपूर्व चाचणीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) निर्विवाद बहुमत मिळवण्याचे संकेत मिळत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 42 ते 56 जागा आप मिळवत आहे.

दिल्ली विधानसभेच्या निकलानंतर भारतीय जनता पक्षाला हा सलग तिसरा धक्का असेल. महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही सत्ता मिळवण्यात अलीकडच्या काळात भाजपला अपयश आले होते. मात्र गेल्या खेपेला अवघ्या तीन जागांवर भाजपाची बोळवण करणारे दिल्लीकर भाजपाच्या पदरात 10 ते 24 जागा टाकतील असा अंदाज मांडण्यात आला आहे. गेल्या विधानसभेला खातेही खोलू न शकलेली कॉंग्रेस यंदा चार जागा मिळवेल असा अंदाज आहे. आपला तब्बल 45.6 तर भाजपाला 37.1 टक्के मते मिळतील. कॉंग्रेसला अवघी 4.4 मते मिळण्याची शक्‍यता आहे. अन्य प्रादेशिक पक्ष 12.9 टक्के मते मिळवतील, असा अंदाज वर्तवला आहे.

अधिक वाचा  सोयगाव नगरपंचायत: रावसाहेब दानवेंना 'जोर का झटका', शिवसेना 17 पैकी तब्बल 9 विजयी

भाजपाला शाहीनबागेचा लाभ
या निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या मुद्‌द्‌यांमध्ये शाहीनबाग आंदोलन हे कळीचा मुद्दा राहणार असल्याचे ठळक वास्तव पुढे येत आहे. सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधातील सुरू असणाऱ्या येथील निदर्शनांनी माध्यमांत नियमित स्थान मिळवले आहे. मात्र, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 62 टक्के जणांनी हे आंदोलन चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर 27 टक्के जणांनी हे आंदोलन वैध असल्याचे मत व्यक्त केले आहे. 11 टक्के जणांनी या मुद्यावर बोलण्यास नकार दिला.

या आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला लाभ होईल असे मत 39 टक्के जणांनी व्यक्त केले. तर आपला या आंदोलनाची मदत मिळेल असे 25 टक्के जणांना वाटते. चार टक्के जणांना कॉंग्रेसला लाभ होईल, असे वाटते. तर 10 टक्के जणांना या आंदोलनाचा कोणालाच लाभ होणार नाही, असे वाटते.

अधिक वाचा  एसटीमहामंडळ 'चालक'आणि वाहक म्हणून करणार यांचा वापर

मोदींचा प्रभाव
प्रचाराच्या अखेरच्या दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आक्रमक प्रचाराचा लाभ भाजपाला होईल असे मत 61 टक्के जणांनी व्यक्त केले. तर त्याचा काहीच प्रभाव पडणार नाही असे 29 टक्के जणांना वाटते. 10 टक्के लोकांनी यावर मत व्यक्त केले नाही.