मुंबई : विधानसभेतील सदस्यांद्वारे तसेच राज्यपाल नियुक्त, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या 24 सदस्यांच्या जागा येत्या पाच महिन्यांत रिक्त होत आहेत. विधानपरिषदेवर वर्णी लागावी यासाठी आघाडी सरकारमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानपरिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने निवडणूक झाल्यास मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील सत्तांतरामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणिते बदलली आहेत. आघाडी म्हणून शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र निवडणूक लढविणार असल्याने या निवडणुकीत भाजपला मित्र पक्ष आणि अपक्षांच्या सहाय्याने किल्ला लढवावा लागणार आहे.
विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या 9 सदस्यांची मुदत येत्या 24 एप्रिल रोजी संपत आहे. त्यात कॉंग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी तीन तर शिवसेनेच्या डॉ. नीलम गो-हे यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाच्या भेटीगाठी घेऊन विधानपरिषदेसाठी आपला दावा सांगायला सुरूवात केली आहे.

अधिक वाचा  बाणेर येथून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला

जून महिन्यात 12 राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची मुदत संपत आहे. विधानपरिषदेवर कला, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रातील व्यक्ती राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची तरतूद आहे. त्यामुळे यावेळी सुध्दा आघाडी सरकारकडून राजकीय नेमणुका होण्याची दाट शक्‍यता आहे. विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारासंघासाठी जून-जुलै महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे.