मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच रोजगाराचा हक्क देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी येथे दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी बोलताना मुंडे यांनी विद्यार्थी करिअरच्यादृष्टीने परिपूर्ण व्हावा यासाठी बार्टीच्या माध्यमातून विविध प्रिशक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
युपीएससी, एमपीएससी, एमबीए, बॅंकिंग, रेल्वे, पोलीस, सैन्य दलातील विविध विभाग यांना अनुसरून विशेष अभ्यासक्रम निश्‍चित करण्यात येतील. याशिवाय उद्योगांच्या निकडीनुसार कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी शेतीविषयक प्रशिक्षण योजना राबविणार असल्याचे मुंडे म्हणाले.

अधिक वाचा  कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: आरोपी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द

जपानमध्ये जपानी भाषा बोलणा-या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विभागामार्फत जपानी भाषा शिकविणारे विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात हक्काची नोकरी मिळवून देण्याचा विभागाचा मानस असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.