पुणे – मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची आवक सुरू झाली आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षी रत्नागिरी आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने विलंबाने झाली आहे. फळ विभागातील अनिरूध्द ऊर्फ बाप्पू भोसले यांच्या मे. नामदेव रामचंद्र भोसले आणि सन्स या फर्मवर ही पहिली आवक झाली. पाच डझनाच्या पेटीस घाऊक बाजारात 21 हजार 500 रुपये भाव मिळाला.

रत्नागिरी तालुका आणि जिल्ह्यातील टेंभे गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून ही आवक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांच्या हस्ते या पेटीचे पूजन करण्यात आले. त्यावेळी अनिरूध्द भोसले, अनिकेत भोसले, ऋषिकेश भोसले, अजिंक्‍य कांचन, बलभीम माजलगावे, आडते असोसिएशनेचे उपाध्यक्ष युवराज काची, करण जाधव, प्रताप निकम, रामदास गायकवाड, भरत परदेशी, संजय वखारे, तात्या कोंडे, राजू ओसवाल, राजू पतंगे, आण्णा हराळे, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे, राजू सुर्यवंशी, तरकारी विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्यासह अन्य व्यापारी आणि बाजार घटकातील व्यक्ती उपस्थित होत्या. रावसाहेब कुंजीर या आडत्याने लिलावात ही पेटी खरेदी केली.

अधिक वाचा  मांजाला ७० फुट उंचावर अडकलेल्या कबुतराची सुटका!

आंब्याच्या हंगामाविषयी अनिरूध्द भोसले म्हणाले, यावर्षी थंडीच्या लहरीपणाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. नेहमीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार असून, त्यामुळे मेपर्यंत आंब्याचे भाव चढेच राहणार आहेत. मेमध्ये भावात घसरण होईल. गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी रत्नागिरी आंब्याची आवक झाली होती. ती यावर्षी आज (दि. 2 फेब्रुवारी) झाली आहे. तर, यावेळी बोलताना बी.जे.देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकाला कमी किंमतीत दर्जेदार माल मिळणे अपेक्षित आहे. मार्केट यार्डातील बाजार दिवसोनदिवस वाढत गेला पाहिजे.