पुणे – जिल्हा परिषदेच्या विषय समिती पदाच्या (सभापती) निवडीला सकाळी अकरा वाजल्यापासून सुरवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्यामुळे चारही सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

त्यामध्ये बांधकाम व आरोग्य सभापतीपदासाठी प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदाला बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी पूजा नवनाथ पारगे तर समाजकल्याण सभापतीसाठी सारिका पानसरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

सभापतीपदाच्या निवडीमध्ये महाविकासआघाडीतील मित्रपक्षाला एक पद द्यावे अशी मागणी शिवसेना आणि कॉग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून कोणत्याच मित्रपक्षाला संधी न दिल्यामुळे शिवसेनेकडून चारही पदासाठी अर्ज भरण्यात आले आहे.

अधिक वाचा  शाळेत पोर नाही...चक्क गुरुजींच भिडले; शिक्षकाचा अंगठा मुख्याध्यापकाने चावला

त्यामध्ये बांधकाम व आरोग्य सभापतीपदासाठी गुलाब पारखे, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदाला दिलीप यादव, महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी भाजपच्या वंदना कोद्रे तर समाजकल्याण सभापतीसाठी शैलजा खंडागळे यांनी अर्ज भरले आहेत. आज (दि. 24) दुपारी तीन वाजता या निवड प्रक्रियेला सुरवात होणार असून, विरोधी पक्षातील सदस्यांनी अर्ज माघारी घेतले नाही तर मतदान घ्यावे लागणार आहे.

त्यामध्ये कॉग्रेसकडून कोणीही अर्ज भरले नसून, शिवसेना आणि भाजपकडून खेळण्यात आलेली खेळी राष्ट्रवादीला निर्णय बदलाला भाग पाडणार का? राष्ट्रवादी कॉग्रेस एकहाती सत्तेवर बाजी मारणार हे येत्या चार तासात स्पष्ट होईल.