पुणे :नाटककार म्हणून राम गणेश गडकरी अतिशय श्रेष्ठ होते. त्यामुळे त्यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा अशी मागणी आज आहे, उद्या करेन आणि कायम राहील असे मत अभिनेते योगेश सोमण यांनी पुण्यात व्यक्त केले. शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त संभाजी उद्यान येथील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची पूजा करण्यात आली. तसेच त्यांचा पुतळा उभा करेपर्यंत संघर्ष करीत राहणार असल्याचा निर्धार साहित्यिक आणि कलावंतांनी केला. यावेळी गडकरी यांच्या प्रतिमेचे व साहित्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेडने गडकरी यांचा पुतळा हटवला होता. त्यानंतर तो अजूनही बसवण्यात आलेला नाही. त्याबाबत रंगकर्मींकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येते. याच विषयावर सोमण यांनी आपले मत मांडले.

अधिक वाचा  जिजाऊ घडली पाहिजे तरच शिवबाचा जन्म होईल : डाॅ.सुनिल वाघमारे

ते म्हणाले की, ‘तीन वर्षापूर्वी ज्या समाजकंटकांनी हा पुतळा तोडला, त्याचा आम्ही निषेध करतो व पुतळा बसविण्यासाठी रंगकर्मीतर्फे आंदोलन करु आणि पुतळा पुन्हा उभा राहीपर्यंत संघर्ष सुरूच ठेवू’. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, ‘भाषाप्रभु गडकरी हे मराठीचे वैभव आहे. गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करू असे आश्वासन पुण्याच्या कारभाऱ्यांनी दिले होते. त्याचे पालन करून पुतळा लवकरात लवकर उभा करावा’. नाट्य कलावंत श्रीराम रानडे असे म्हणाले की आज गडकरी यांना मला वंदन करायला मिळते हे अभिमानास्पद आहे. अभिनेते विजय गोखले यांनी आपल्या भाषणामध्ये गडकरींच्या शताब्दी निमित्त त्यांच्या एकच प्याला या संगीत नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने युवा पिढीला गडकरींची ओळख करून द्यायची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे.

अधिक वाचा  यंदा परिवर्तन अटळ; राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार! गोव्यातही महाविकास आघाडीचे संकेत

या कार्यक्रमात आनंद पानसे, विजय कुलकर्णी, कवी राजन लाखे, प्रा.श्याम भुर्के, प्रा.क्षितिज पाटूकले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रस्ताविक व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.