पुणे -‘राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका, देशातील आठव्या क्रमाकांचे महानगर तसेच सर्वाधिक राहण्यायोग्य शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षित नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे दैनंदिन समस्यांबाबत पुणेकरांच्या महापालिकेकडून खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी महापालिकेचा रिस्पॉन्स टाइम कमी असला पाहिजे,’ अशी अपेक्षा मावळते आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी व्यक्त केली.

महापालिका अधिकारी आणि कामगार संघटनेच्या वतीने राव यांच्या निरोप समारंभासह नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राव बोलत होते. अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, शांतनू गोयल यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा  प्रजासत्ताक दिन: 'बीटिंग द रिट्रीट' सांगता गाण्याचा वाद काय? आता हे गीत वाजणार

राव म्हणाले, ‘महापालिकेच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकण्याचा अनुभव आला, यापूर्वी आपण जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागात काम केले होते. त्यानंतर महापालिकेचा हा पहिलाच अनुभव होता. सुमारे पावणेदोन वर्षांत अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या. त्यात, प्रामुख्याने लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा माफक असून त्या पूर्ण करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत काम करणे अडचणीचे जाते.

मात्र, मानवी दृष्टिकोनातून हेच काम पाहिल्यास ते योग्य वाटते. नियम, भविष्यात होणारे ऑडिट, बदलत्या काळात संबंधित निर्णयाचे परिणाम याचा विचार करून काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यामुळे शहरासाठी अनेक चांगली कामे करता आल्याचा आनंद आहे.’

अधिक वाचा  यशोमती ठाकूर यांची महिलांसाठी मोठी घोषणा

प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
यावेळी स्वागत सत्कारपर भाषणात, राव यांनी सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. पुणेकरांच्या दैनंदिन समस्या प्रभावीपणे सोडवण्यावर आपला भर राहणार असल्याचे गायकवाड म्हणाले. प्रशासकीय कामकाज करणाऱ्या प्रत्येकामध्ये आपण नागरिकांच्या पैशांतून वेतन घेतो, त्यामुळे त्यांची एकतरी समस्या आपण सोडवणे बांधील आहोत, असा विश्‍वास प्रशासनात निर्माण करून शहर विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे गायकवाड म्हणाले.