पुणे -‘महापालिकेत काम करताना सामान्य नागरिक, त्याला रोज भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्याला माझा प्राधान्यक्रम राहील,’ अशी ग्वाही नवनियुक्त महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी दिली. साखर आयुक्तपदावरून पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी दुपारी आयुक्त सौरभ राव यांच्याकडून गायकवाड यांनी सूत्रे स्वीकारली. आयुक्त म्हणून काम करताना जी उद्दिष्टे ठेवणार आहे, त्याविषयी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

‘सामान्य माणसांचे प्रश्‍न म्हणजे वाहतूक, पाणी या दैनंदिन प्रश्‍नांमध्ये प्राधान्याने लक्ष घालणार आहे. त्यानंतर सुरूवातीचे तीन महिने संस्थात्मक आणि सार्वजनिक प्रश्‍न समजून घेऊन ते सोडवण्याच्या उपाययोजनांसाठी देणार असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. भूजल सर्वेक्षण आयुक्त म्हणून काम करताना पुण्याच्या भूगर्भातील पाणीसाठ्याबाबतही अभ्यास झाला असून, सर्वांना पुरेसे पाणी मिळेल, यासाठी दक्षता घेईन, असे आश्‍वासन गायकवाड यांनी दिले.

आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकार, मंत्रालयात केलेल्या कामाचा अनुभव निश्‍चित कामाला येईल. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नाला प्राधान्य राहील. यासाठी पुढील तीन महिन्यांत शहरातील शैक्षणिक संस्थांसारख्या मोठ्या आस्थापनांचे प्रश्‍न आणि त्यावरील उपायांचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याला माझे प्राधान्य राहील,’ असे गायकवाड यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

अधिक वाचा  स्वत:च्या घरात राहणाऱ्या पुणेकरांना कराचा हजारो रुपयांचा भार

वाहतूक, पाणी प्रश्‍नावर फोकस
शिक्षण पुण्यात झाल्याने आणि त्यानंतर यशदा, भूजल सर्वेक्षण आणि साखर आयुक्त म्हणून या शहराशी संबंध जोडला गेला आहे. येथील प्रश्‍नांची जाणीव आहे. शहरात पाऊल ठेवताच भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न, त्यातून युवकांचा या गर्दीच्या प्रवासात जाणारा दीड-दोन तासांचा वेळ. आयटीमध्ये काम करणाऱ्या युवकांनाही कामाच्या ठिकाणी आणि तेथून घरी जाण्यासाठी दीड ते दोन तास जातात, हे दृश्‍य संवेदनशील मनाला पटत नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडवण्याबरोबरच अत्यावश्‍यक असलेल्या पाण्याच्या प्रश्‍नांवरच ‘फोकस’ असेल, असे गायकवाड यांनी नमूद केले.

दि. 27 जानेवारीलाच अंदाजपत्रक मांडणार
पुणे, दि. 22 -महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक आता दि. 27 जानेवारीला सादर करण्यात येणार आहे. नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड हे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. दरम्यान, हे अंदाजपत्रक दि. 24 जानेवारीला सादर करण्याचा निर्णय सौरभ राव यांनी घेतला होता. मात्र, सोमवारी झालेल्या मुख्यसभेत हे अंदाजपत्रक 27 जानेवारीला सादर करण्यात यावे, अशी उपसूचना देऊन नवीन तारीख निश्‍चित करण्यात आली. सर्वसाधारणपणे महापालिका आयुक्त दि.15 ते 17 जानेवारीदरम्यान प्रशासनाचे अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर करतात. त्यानंतर या अंदाजपत्रकावर स्थायी समिती चर्चा करून स्थायी समिती अध्यक्ष आपले अंदाजपत्रक सादर करतात. त्यासाठी समिती सुमारे 15 ते 20 दिवसांचा कालावधी घेते.

अधिक वाचा  डिसले गुरुजींचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा; शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

मात्र, या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण तसेच इतर प्रकल्पांच्या बैठकांमुळे आयुक्तांनी दि. 24 जानेवारीला अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्यानंतर जानेवारीच्या मुख्यसभेत हा विषय मान्यतेसाठी आला होता. मात्र, आयुक्त राव यांनी आणखी तीन दिवसांची मुदत वाढवून मागितल्याने उपसूचना देऊन अंदाजपत्रकाची तारीख पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, आता राव यांची बदली झाल्याने हे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्‍त शेखर गायकवाड सादर करणार आहेत.

शेखर गायकवाड यांचा परिचय
पालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी कृषी क्षेत्रातील एम.एसस्सी. पदवी संपादित केली असून, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांनी वकिलीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव, राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, मुख्य प्रशासकीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, ‘यशदा’मध्ये निबंधक, ठाणे जिल्हापरिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आणि त्यानंतर सांगली जिल्हाधिकारी, भूजल विभागाचे संचालक आणि साखर आयुक्त या पदावर त्यांनी काम केले आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक Rating असलेले लोकप्रिय नेते

कोल्हापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सोलापूर, हवेली, बारामती उपविभाग आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुक्रमे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर त्यांनी काम केले आहे.

लिहिलेली पुस्तके
लॅन्ड लॉज इन महाराष्ट्रा, लॅन्ड इश्‍यूज इन इंडिया, स्पर्धेच्या पलिकडे, लॅन्ड राईटस ऍन्ड म्युटेशन्स, प्रशासनाच्या नव्या वाटा, शेतकऱ्यांनो जमिनी सांभाळा, कायदा माहिती अन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, धान्य योजना (मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत), महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायीक कामकाज, शेतीचे कायदे, गोष्टीरूप जमीन व्यवहार निती, फेरफार नोंदी-एक आदर्श कार्यपद्धती, शेतकऱ्यांनो सावधान आदी.

याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी कारकीर्दीत राबवलेले अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्यांनी अनेक विषयांत व्यावसायिक प्रशिक्षणही घेतले आहे.