पुणे : ऑलिम्पिकच्या पहिल्याच पात्रता फेरीमध्ये चार भारतीय कुस्तीपटू पात्र ठरले आहेत. अजून तीन फेऱ्या असल्याने आणखी कुस्तीपटूंची निवड होईल. त्यामुळे येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांची वाट पाहावी लागणार नाही. किमान दोन-तीन पदके कुस्तीतूनच मिळतील, असा विश्वास कुस्तीपटू गीता फोगाट यांनी व्यक्त केला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘झेस्ट-२०’ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी फोगाट यांच्या हस्ते झाले. तत्पुर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जागतिक पातळीवर कुस्तीपटूंसह अन्य खेळाडूंचा आत्मविश्वास वाढू लागला असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, प्रत्येक खेळाडूचे लक्ष्य ऑलिम्पिक असते. त्यादृष्टीने खेळाडू प्रयत्न करत असतात. आता त्यांना सरकारचीही साथ मिळू लागली आहे. ऑलिम्पिकच्या पहिल्याच पात्रता फेरीत चार कुस्तीपटू निवडले गेले आहेत. पुढील फेऱ्यांमध्ये आणखी काही जणांची निवड होईल. प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदकांची वाट पाहावी लागते. पण यावेळी कुस्तीपटू निराशा करणार नाहीत. सध्या ते ज्यापध्दतीने खेळत आहेत, त्यावरून पदकांची अपेक्षा आणखी उंचावली आहे.
खेलो इंडिया सारख्या स्पर्धांमुळे खेळाडूंना व्यासपीठ मिळू लागले आहे. मी खेळायला सुरूवात केली तेव्हा शाळा किंवा जिल्हा स्तरापर्यंत स्पर्धा होत होत्या. पण आता राज्य, राष्ट्रीय पातळीवर संधी मिळू लागली आहे. त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. खेळांविषयी लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुर्वी खेळाडूंपर्यंत निधी पोहचत नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. सध्या पुरेसा निधी मिळत नसला तरी हरयाणा सरकारप्रमाणे सर्व राज्य सरकारांनी खेळाडूंसाठी विविध योजना तयार करायला हव्यात. ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये खुप क्षमता आहे. त्यामुळे या भागात प्राधान्याने सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. ही स्थिती आणखी सुधारून पुढील ५-१० वर्षात आपला खेळ जागतिक पातळीवर वेगळ्या उंचीवर पोहचेल, असे फोगाट यांनी सांगितले.

अधिक वाचा  'राज्यातील प्रश्नावर एकदा तरी लिहिलं का?' फक्त राजकारण करायला..., रोहित पवार