नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपला वीस वर्षांचा राजकीय वनवास संपविण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत 70 खासदारांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपातील सूत्रानुसार, दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत. यातील प्रत्येक मतदारंसघात भाजपने एका खासदाराची ड्युटी लावली आहे. अशाप्रकारे 70 मतदारसंघांमध्ये भाजपचे 70 खासदार उमेदवाराला विजयी करण्यासाठी दिवसरात्र एक करताना दिसतील.

एवढेच नव्हे तर, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. लोकसभेच्या एका मतदारसंघात विधानसभेच्या दहा जागा आहेत. भारतीय जनता पक्ष गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सत्तेपासून वंचित आहे. आता तरी हा वनवास संपावा यासाठी भाजपला कोणतीही उणीव राहू द्यायची नाही. भाजपचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुध्दा दिल्लीत प्रचारासाठी येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपने सर्व स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामुळे पुढचे 15 दिवस देशाच्या राजधानीत देशभरातील दिग्गज राजकीय मंडळींची रेलचेल बघायला मिळेल.

अधिक वाचा  पहिल्या, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत सर्वाधिक ४० टक्के पॉझिटिव्हिटी