मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी केली. देशातील काळा पैसा बाहेर येईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे दावे मोदी सरकारने केले. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडलेच पण मोदींनी मोठमोठे दावे केलेला काळा पैसा काही बाहेर आला नाही. उलट ही नोटबंदी पूर्णत: फसवी ठरल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) अहवालातील आकडेवारिचा संदर्भ देत भाजपाला चांगलेच फटकारले आहे. नरेंद्र मोदी यांच्या दाव्यानुसार ५०० आणि २००० या नव्या नोटांची नक्कल करून बोगस नोटा तयार करणे कठीण असल्याचे सांगण्यात आले होते. सर्वाधिक बनावट नोटांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  106 नगरपंचायंती Election: विजयाचा गुलाल कुणाला?; मंत्र्यांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

‘देशभरातून जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांमध्ये २ हजाराच्या नोटांचा आकडा ५३.३ टक्क्यावरून २०१८ मध्ये ६१.०१ टक्क्यांपर्यत पोहोचला तर ५०० रुपयांच्या नोटा १.५७ टक्क्यावरून ७.२१ टक्क्यांपर्यंत गेला. विशेष म्हणजे, २०१८ च्या अखेरपर्यंत पंतप्रधानांच्या गुजरातमध्येच २ हजाराच्या तब्बल ३४,६८० बोगस नोटा आढळून आल्यात. यानंतर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे नोटबंदीसारखे निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणाऱ्या पंतप्रधान मोदींचे सर्व दावे फोल ठरले आहेत.