नवी दिल्ली : 72 वा सेनादिवस आज देशभर साजरा केला गेला. भारतीय लष्कराचे शेवटचे ब्रिटिश प्रमुख सर एफआरआर बचर यांच्याकडून जनरल के एम करीअप्पा यांनी 1949 मधे याच दिवशी पदभार स्वीकारला, आणि स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख झाले. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
72 व्या सेनादिनानिमित्त लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी सर्व स्तरांमधल्या जवानांचे त्यांच्या कुटुंबियांचे, निवृत्त जवान तसेच वीर नारींचे अभिनंदन केले. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या प्रत्येक आव्हानाला भारतीय लष्कराने तोंड दिले आहे.
तसेच आपले समर्पण आणि उच्चस्तरीय व्यावसायिक कौशल्यामुळे ते एक बहुमितीय आणि कणखर सेनादल बनले आहे, असे जनरल नरवणे यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे. भारतीय लष्कर तांत्रिकदृष्ट्‌या स्वयंपूर्ण होण्यासाठी गतिमान पावले उचलत आहे, असे नरवणे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

कोणत्याही धोक्‍याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी केले आहे. ते आज बहात्तरावा सेनादिनानिमित्त दिल्ली कॅन्टोन्मेंट इथं आयोजित कार्यक्रमा बोलत होते.

दहशतवाद मोडून काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही पर्यायाचा अवलंब करायला लष्कर कचरणार नाही. देशाच्या ईशान्य भागात हिंसाचाराच्या घटनांमधे लक्षणीय घट झाली आहे, असे त्यांनी सांगितले. जम्मू-कश्‍मीरसाठीचे 370 वे कलम रद्द केल्यामुळे हा केंद्रशासित प्रदेश मुख्य प्रवाहाशी जोडण्यात मदत होईल. शेजारी देश करत असलेल्या छुप्या युद्धालाही त्यामुळे आळा बसेल. संरक्षण दलांमधे कोणत्याही प्रकारच्या पक्षपाताला वाव नाही, शहिदांच्या कुटुंबांना 11 कोटी रुपये भरपाई रक्कम दिली आहे, असे त्यांनी सांगितले.