मुंबई: ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करण्यात आल्यानंतर भाजपावर देशभरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेतले असून माफी मागितली. प्रत्यक्षात, गोयल यांनी पुस्तक मागे घेतलेले नाही वा माफी देखील मागितलेली नाही. त्यामुळे प्रकाश जावडेकर आणि गोयल यांनी भाजपाच्या कार्यालयात एक संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी व माफी मागून पुस्तक मागे घेतल्याचे जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
तसेच आजच्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी भाजपा व पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्यासंदर्भात साधा उल्लेख देखील केला नाही. कारण, उदयनराजे हे भाजपामध्ये काही मिळेल या आशेने गेले होते. पण त्यांना काही मिळाले नाही. म्हणून भविष्यात काही मिळण्यासाठी ते भाजपासमोर लोटांगण घालत आहेत, अशी जळजळीत टीकादेखील मलिक यांनी केली.

अधिक वाचा  नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा; राज्यपालांना भाजपचे निवेदन

तसेच ‘जाणता राजा’ हा विषय चर्चेत आणून जाणीवपूर्वक मूळ विषयापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न होतोय, असा दावा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. शरद पवार कधीही स्वतःला जाणता राजा म्हणत नाहीत. जाणता राजा म्हणजे सर्व विषयांची जाण असणारा नेता. असे असले तरी पक्षातर्फे कधीही ही उपमा वापरण्यात आलेली नाही, ही उपमा पवार साहेबांना लोकांनी दिली आहे. मात्र, जयभगवान गोयल यांच्या कृत्याचा साधा उल्लेखही न करत इतरांवर बोट ठेवणाऱ्या भाजपातील नेत्यांची लाचारी स्पष्टपणे दिसून येतेय, अशा शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडले.