चांदूर रेल्वे (अमरावती) : देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याचा मोदी-शहा जोडीचा अट्टाहास हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारा असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केली. सीसीए व एनआरसी या दोन कायद्यांच्या विरोधात चांदूर रेल्वे येथे रविवारी लोकजागर सभा घेण्यात आली. त्यावेळी आव्हाड बोलत होते. देशभरात दारिद्र्य, महागाई, आर्थिक मंदी आदी डझनावर प्रश्न प्रलंबित असताना सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वळविण्यसाठी केंद्र सरकारने कायद्याच्या नावावर षड्यंत्र रचल्याचा आरोप ना.आव्हाड यांनी केला.
डॉ.बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेवर घाला घालण्याचा घाट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी विद्यार्थी नेता उमर खालीद यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशातील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारने कायद्याच्या नावावर अल्पसंख्याकांची गळचेपी चालविल्याचा आरोप खालीद यांनी केला. जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व बजरंग दलाचे गुंड घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारकडून सर्वसामान्यांवर हे अत्याचार होत असून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण जागर चालविला असल्याचे खालीद म्हणाले. दरम्यान गृहनिर्माण ना. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारमधील मोदी, शहा या जोडगोळीवर टीकास्त्र सोडत सीएएचा जोरदार विरोध केला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम भस्मे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सुनील मेटकर, मौलाना तनशीब, प्रभाकर वाघ, प्रदीप वाघ, गणेश रॉय, नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी उपस्थित होते. लोकजागर सभेचे संचालन प्रसन्नजीत तेलंग यांनी, तर प्रास्ताविक सागर दुर्गोधन यांनी केले. सभेला चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा  अमृता फडणवीस यांनी काव्यशैलीत नाना पटोले यांना लगावला टोला