वॉशिंग्टन : अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याचे पडसाद आता जगावर पडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण या हवाई हल्ल्यामुळे पुढच्या काही दिवसात इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. इराणने त्यांच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमासंबंधी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे जगाची चिंता वाढणार आहे. सध्या जगभरातून आखातात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये इराणचे टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खवळलेल्या इराणने अणवस्त्र कार्यक्रमासंबंधी हे पाऊल उचलले आहे. 2015 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकारने हा अण्वस्त्र करार झाला होता.

अधिक वाचा  सानिया मिर्झा ने केली निवृत्तीची घोषणा; 2022 मध्ये शेवटचा सीजन

विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली आणि या संघर्षाला सुरुवात झाली. सुलेमानी यांच्या हत्येने हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणने थेट अमेरिकेला धमकी दिली आहे. सुलेमानी यांच्या रक्ताने ज्यांचे हात माखले आहेत, त्यांना सोडणार नाही असा इशारा इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला आहे.

2015 मध्ये झालेल्या अण्वस्त्र करारानुसार इंधनाच्या समृद्धीकरणावर निर्बंध होते. त्या निर्बंधांचे पालन न करण्याची भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर कुठल्याही मर्यादा नाहीत ही हसन रौहानी प्रशासनाची भूमिका इराणच्या सरकारी वाहिनीवरुन जाहीर करण्यात आली. दरम्यान, इराणने अण्वस्त्र विकसित करु नयेत, यासाठी 2015 साली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेबरोबर हा करार करण्यात आला होता. सुरक्षा परिषदेमध्ये ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने या करारातून एकतर्फी माघार घेतली.