हडपसर : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल केल्याशिवाय सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावणार नाही . राजसत्तेमध्ये बसलेल्या लोकांना सर्वसामान्य नागरिकांशी काहीच देणेघेणे नाही . जात , पंथ , धर्माच्या नावाखाली बेंबीच्या देठापासून ओरडणारे फक्त राजकीय स्वार्थ साधत आहेत . परंतु ,अर्थकारण या विषयावर कोणताच राजकीय पक्ष ठामपणे भूमिका घेताना दिसत नाही . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आणि अर्थव्यवस्थेवर बोलण्यासाठी आता एकत्र येऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय आर्थिक क्रांती होणार नाही . असे मत , अर्थविश्लेषक प्रभाकर कोंढाळकर यांनी व्यक्त केले .
उत्तम कामठे आणि मित्र परिवाराच्या वतीने देशाची अर्थव्यवस्था मला मान्य नाही , चर्चा अर्थकारणाची याविषयी फुरसुंगी याठिकाणी जनजागृती अभियान आणि रथयात्रा शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी व्यासपीठावर अर्थविश्लेषक प्रभाकर कोंढाळकर , परिवर्तन शिक्षण संस्था संस्थापक शोभा लगड , संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष जोतिबा नरवडे , मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान सचिव स्वाती महेश टेळे ,नमो फाऊंडेशनचे अनुप गौड , विवेक तुपे , पप्पू पांडव , सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते . पुढे बोलताना कोंढाळकर म्हणाले ,” देशाची आर्थिक परिस्थिती खूपच गंभीर आहे . उद्योगपती आणि राजकारणी यांची छुपी युती असून त्यांना प्रशासनातील अधिकारी सर्व प्रकारचे सर्व ते सहकार्य करत आहेत . देशातील कष्टकरी , कामगार , शेतकरी , नोकरदार यांच्या कष्टाचा पैसा विविध करांच्या माध्यमातून राजरोसपणे दरोडा टाकून लुटला जात आहे . दाम दुपटीचे आमिष दाखवून साखळी पद्धतीच्या कंपन्या आणि पुंजी स्कीम सारख्या योजना सरकारच्या मदतीवर सुरु असून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत .गोरगरीब नागरिकांचा पैसा लुटत आहेत . विविध बँका , फायनान्स कंपन्या कमी व्याजदराचे आमिष दाखवून दामदुपटीने सक्तीची वसुली करून आर्थिक पिळवणूक करत आहेत . देशाचा जीडीपी पूर्णतः नियंत्रणाच्या बाहेर गेला तरीही देशपातळीवर त्याचा गांभीर्याने विचार केला जात नाही . आपले पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले म्हणूनच देश स्वतंत्र झाला . आता आर्थिक स्वातंत्र्याची लढाई करण्याची जबाबदारी आपली आहे तरच पुढच्या पिढीचे उज्वल भविष्य असणार आहे .त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आर्थिक चळवळ उभा करणे हीच काळाची गरज आहे .यावेळी शोभा लगड , जोतिबा नरवडे यांनीही मनोगत व्यक्त केले .
अर्थकारण याविषयी सुरू केलेली प्रचार-प्रसार रथयात्रा फुरसुंगीगावांमध्ये सर्व भागात फिरवून नागरीकांना अर्ज भरण्याची विनंती करून जनजागृती अभियानास सुरवात करण्यात आले .त्यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे .
कार्यक्रमाचे आयोजन नियोजन उत्तम कामठे , महेश टेळे , योगेश शिंदे , मारुती काळे , रमजान शेख , अतुल येवले यांनी केले होते .

अधिक वाचा  एसटी महामंडळाचा खाजगी वाहतूकदारांना झटका ,नवा निर्णय काय?