मुंबई : ‘अबकी बार ६५ पार’ अशी घोषणा भाजपने झारखंड निवडणुकीत दिली होती. पण त्यांना ६५ च्या निम्म्यासुद्धा जागा मिळाल्या नाहीत. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये जनता नाकारत आहे. गुजरातपासून सुरू झालेला हा ट्रेंड झारखंडमध्येही दिसून आला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

झारखंड मुक्ती मोर्चा, लालूप्रसाद यादवांचा राजद, काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी झारखंडमध्ये सरकार स्थापन करेल. मागील ५ वर्षांत झारखंडमध्ये गरिबीचे प्रमाण वाढले असून जवळपास ४६% जनता दारिद्र्यरेषेखाली आहे. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण २८% आहे. झारखंडमधील बेरोजगारीने कळस गाठला असून औद्योगिक आणि सेवा क्षेत्र ठप्प झाल्यामुळे बेरोजगारीचा दर २०.४% झाला आहे. यावर भाजपने कोणताही ठोस कार्यक्रम दिला नव्हता, असेही चव्हाण यांनी सांगितले.

अधिक वाचा  Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच

नऊ सभा घेऊन काय फायदा?
झारखंडमध्ये नरेंद्र मोदींनी ८ ते ९ सभा घेतल्या. अमित शहा यांनी १६ ते १७ सभा घेतल्या. मोठ्या ताकदीने निवडणुकीत ते उतरलेले पाहायला मिळाले. त्या तुलनेत काँग्रेसचे नेतृत्व उतरताना दिसले नव्हते. महाराष्ट्र आणि हरयाणातसुद्धा काँग्रेस नेतृत्व उतरले नसताना तेथील जनतेने भाजपला नाकारले, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. येणाऱ्या बिहार व दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळणार नाही, असे भाकीतही त्यांनी केले.