पुणे – राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त विशेष बोधचिन्हाची घोषणा रविवारी करण्यात आली. एफटीआयआयची स्थापना सन 1960 मध्ये झाली असून, संस्था सन 2020 मध्ये हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. संस्थेच्या बैठकीमध्ये या बोधचिन्हाला (लोगो) मान्यता देण्यात आली.

‘भारतातील सर्वोत्कृष्ट फिल्म इन्स्टिट्यूट म्हणून अलीकडेच जगातील पहिल्या 10 फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एफटीआयआयने स्थान पटकाविले आहे. संस्थेचा हीरक महोत्सव माजी विद्यार्थी आणि देशासाठी विशेष क्षण आहे. त्यामुळे एफटीआयआय हीरक महोत्सवी वर्षाच्या संयोजन समितीकडून विशेष बोधचिन्हाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत बोधचिन्हाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली,’ असे संस्थेचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांनी सांगितले.

अधिक वाचा  सत्ताधारी कमी पडले, नागरिकांची पहिली पसंती भाजपला -पंकजा मुंडे

विशेष बोधचिन्हाची संकल्पना आणि निर्मिती संस्थेचे आर्ट डायरेक्‍शन ऍन्ड प्रॉडक्‍शन डिझाइन विभागाचे प्रमुख विक्रम वर्मा यांची यांची आहे. वर्मा हे संस्थेच्या सन 1998 च्या तुकडीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 250 पेक्षा अधिक टीव्हीसी फिल्म आणि 400 हून अधिक व्यावसायिक चित्रपटांसाठी ‘व्हिज्युअल डिझायनिंग’, ‘आर्ट डायरेक्‍शन’, ‘मोशन ग्राफिक्‍स’ आणि ‘शो पॅकेजिंग’चे उल्लेखनीय कार्य केले आहे.