नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॉंग्रेस मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची चर्चा आहे. महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात संभावित मंत्र्यांची यादी घेवून दिल्लीत रविवारी दाखल झालेत.

कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षाची धुरा दिली जाणार आहे. तर आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री पद सोडावे लागलेले अशोक चव्हाण यांची ठाकरे मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भातील नेत्यांचा वरचष्मा राहण्याची शक्‍यता आहे. यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि सुनिल केदार यांच्यासह यशोमती ठाकूर यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

अधिक वाचा  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन

याशिवाय, माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख, माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्‍वजित कदम, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, प्रणित शिंदे आदींच्या नावांची चर्चा आहे. मात्र, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यातील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे.