पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी धोबीघाट येथे असलेल्या श्री शिव महाकालेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सव प्रमुख श्री. दत्तभक्त विक्रांत (अण्णा) विकास वशिष्ठ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या भव्य महोत्सवाचे आयोजन केले होते.
महोत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करून विधीवत पूजा, अभिषेक, होमहवन व विविध धार्मिक विधी पार पडले. सकाळपासूनच पंचक्रोशीतील शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. “हर हर महादेव” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.दुसऱ्या दिवशी महा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी १ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. पुणे शहर व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी उत्सव प्रमुख विक्रांत (अण्णा) विकास वशिष्ठ यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. तसेच त्यांच्या मातोश्री श्रीमती वंदनाताई विकास वशिष्ठ यांनीही सर्व शिवभक्तांचे आभार मानले.
पंचक्रोशीतील भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून महाशिवरात्रीचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.महाशिवरात्रीचा हा भक्तिमय सोहळा परिसरासाठी श्रद्धा, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.






