शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचा उद्या मुंबईत प्रकाशन सोहळा होणार आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शाह यांना कशाप्रकारे मदत केली याविषयी पुस्तकात दावा केला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळांनी मोजक्या शब्दात उत्तर देत विषय संपवला. भुजबळ म्हणाले, मी आजून राऊतांनी लिहलेलं पुस्तक वाचलेलं नाही. पण, पीएम नरेंद्र मोदी हे दोन हजार सालानंतर मुख्यमंत्री झाले. मी मात्र, १९९२ मध्येच शिवसेना सोडली आहे. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली याविषयी मला काहीही अधिकृत माहिती नाही. दुर्देवाने बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. त्यामुळे शरद पवार साहेबच याविषयी काय ते सांगू शकतात असं सांगून भुजबळांनी अधिक बोलणं टाळलं.
त्याकाळी बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. त्यामुळे कदाचित काहीतरी मदत झाली पण असेल असेही भुजबळ यावेळी म्हटले. कुणी काय लिहावं, काय बोलावं यावर आपण कसं काय बंधन टाकणार असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे बोलले जात आहे. त्याविषयी विचारले असता भुजबळ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे मला वाटत नाही. अजित पवार यांनीच तसे स्पष्ट केल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळे या चर्चेत काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. काही लोकांची तशी इच्छा असू शकते परंतु तसा प्रस्ताव किंवा चर्चा वैगेरे काही नाही असं भुजबळ म्हणाले. अजित पवारांनी या सगळ्या उडवून लावलेल्या आहेत असं भुजबळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आधीच सांगितलं आहे. परंतु या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे काही ठिकाणी त्याला अपवाद म्हणून स्वतंत्र निवडणुका लढवल्या जाऊ शकतात असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मागच्या विधानसभेला सुद्धा अनेक ठिकाणी महायुतीच्या दोन पक्षांनी महाविकास आघाडीच्या विरोधात फॉर्म भरले होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर आहे. कारण शेवटी कार्यकर्त्यांनाही पुढे यावं लढावं अशी अपेक्षा असते असं भुजबळ म्हणाले.