राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाचा शहराध्यक्ष कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर दत्ता धनकवडे व माजी नगरसेवक आप्पा रेणुसे यांच्या नावांची पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. परदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शंतनू कुकडे याच्यासह आठ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच प्रकरणातील आरोपी रौनक जैन याने दीपक मानकर व त्यांच्या मुलाच्या बॅंक खात्यात पावणे दोन कोटी रूपये टाकल्याचे प्रकरण पुढे आले होते.
मानकर यांच्याविरुद्ध जमीन खरेदी प्रकरणी बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मानकर यांनी मंगळवारी रात्री शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. मानकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाल्यानंतर शहर कार्यकारणी मध्ये विद्यमान आमदारांनी घेतलेला सहभाग लक्षात घेता पूर्ण कार्यकारिणी त्यांच्या ताब्यात देणे किती योग्य आहे यावरही चर्चा करण्यात आली. शहर कार्यकारणी मध्ये कार्यकर्त्यांना वेळ देण्यासाठी पूर्णवेळ काम करणारा शहराध्यक्ष असेल तरच पुणे महापालिकेतील पूर्वीची सन्मानाची जागा गाठण्यासाठी कार्यकर्त्यातील चेहऱ्याची निवड करावी अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाची शहराध्यक्षपदासाठी चर्चा झाली.
तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांना शहराध्यक्षपदी बढती देण्यावरही चर्चा झाली. तुपे, टिंगरे व देशमुख या तिन्ही नावांची शहराध्यक्षपदासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शहराध्यक्षपदी नेमकी कोणाला संधी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.