पहलगामवरील हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. हा तणाव फक्त सीमेवरच नाही तर सायबर हल्ल्यातूनही दिसून येत आहे. अपप्रचार करून गोंधळ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरविण्याचे प्रयत्न होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रकाशझोतात आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या देशभक्तीबद्दल सर्वांनाच अप्रूप वाटले. मात्र सोफिया कुरेशींच्या बेळगावमधील घरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्यांनी हल्ला केल्याची अफवा सोशल मीडियावर उठविण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी याची दखल घेऊन सदर पोस्ट डिलीट केली आहे.

एक्सवर अनीस उद्दीन या अकाऊंटवरून सदर खोटी पोस्ट शेअर करण्यात आली होती. कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या मुलावर हल्ला झाला असून घराला आग लावण्यात आल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता. सोफिया कुरेशी यांच्या घराबाहेर मुस्लीम समाजाविरोधात द्वेषपूर्ण घोषणा दिल्या गेल्या, असाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला होता.

अधिक वाचा  राज्य सरकारकडून रस्त्यावरच्या मुलांसाठी ‘मोबाईल स्क्वॉड’ योजना; ३१ व्हॅनद्वारे सेवा सुरू

सदर अकाऊंटचे लोकेशन कॅनडामधील ब्रिटिश कोलम्बिया येथील दाखवले गेले. या अकाऊंटवरून ४०५ जणांना फॉलो करण्यात आले होते. तर त्याचे ३१ फॉलोअर्स होते. विशेष म्हणजे हे अकाऊंट व्हेरिफाईड ब्लू टीक असलेले अकाऊंट होते. तसेच पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जीना, लष्करप्रमूख असीम मुनीर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा फोटो अकाऊंटला जोडण्यात आलेला होता.

 कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर घरावर हल्ला झाल्याची डिलीट केलेली खोटी पोस्ट-

एक्सवरील @JN_Araain या आणखी एका अकाऊंटवरून अशाच प्रकारची पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिले गेले, “RSS ने पुन्हा एकदा द्वेष पसरविला. भारतीय लष्कराच्या अधिकारी आणि प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. बेळगावमधील त्यांच्या घरावर मध्यरात्री ३ वाजता हल्ला करण्यात आला. मुलगा समीर गंभीर जखमी झाला आहे. तर घर पेटवून देण्यात आले. कुरेशी यांचे कुटुंब सध्या दिल्लीत लष्कराच्या संरक्षणाखाली आहे.”

अधिक वाचा  बाप म्हणाला मला चिंता, मुलगी म्हणाली मी पप्पा! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कर्नाटक पोलिसांनी काय म्हटले?

बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी सदर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अशाप्रकारची घटनाच घडली नसल्याचे स्पष्ट केले. सदर पोस्ट खोटी असून केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी केली असल्याचे त्यांनी म्हटले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एसएन श्रुती यांनीही ही पोस्ट बोगस असल्याचे म्हटले. “ही पोस्ट ज्या अकाऊंटवरून शेअर झाली, त्याचे वापरकर्ते परदेशातील आहेत. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कुरेशी यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात आली असून आम्ही पुढील तपास करत आहोत.

ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल कुरेशी यांच्याशी संबंधित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सात गटांची ओळख पटवली होती, ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या संकेतस्थळांना लक्ष्य करणारे १५ लाख सायबर हल्ले केले होते. यापैकी केवळ १५० हल्ले यशस्वी ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  प्रभाग ११ची अनोखी नाळ: ‘राम’राज्य ‘चंद्र’छायेचे कदम अन् समाजसेवी वारश्याचे ‘हात’!

महाराष्ट्र सायबर विभागाने रोड ऑफ सिंदूर नावाच्या अहवालाच्या माध्यमातून पाकिस्तान पुरस्कृत सायबर हल्ल्यांची माहिती दिली असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.