महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. देशभरात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे. अशातच बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे या दरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असे असेल. 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
पावसाची कधी आणि कोणत्या राज्यांमध्ये शक्यता?
हवामान विभागाने 16 मे पर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, 13 आणि 14 मेदरम्यान गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, पुद्दुचेरी, कराईकल, रायलसीमा, आंध्र प्रदेशातील किनारी भाग या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात काय परिस्थिती?
राज्यात नैर्ऋत्य मोसमी पावसाची हालचाल सुरू झाली आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समोरच्या काही भागांत नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी (ता. 14) राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मेच्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी पाऊस पडतो आहे. आज (बुधवारी) विदर्भातील बुलडाणा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यातील 22 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट विभागासह), नाशिक (घाट विभागासह), कोल्हापूर (घाट विभागासह), सातारा (घाट विभागासह), सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
पुणे शहरामध्ये पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असून, काल (मंगळवारी ता. 13) पावसाच्या सरी बरसल्या. पुढील चार दिवस शहरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. शहरात काल (मंगळवारी) झालेल्या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असून, नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. मॉन्सूनपूर्व हवामानातील बदल, चक्रीय स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे शहरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.