चांदणी चौक येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात होत आहे. तथापि, सध्या प्रस्तावित आराखडा नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा आणि कमी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः, पुलाची रचना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले आणि महिलांसाठी वापरण्यास कठीण असल्यामुळे हा पूल निरुपयोगी ठरू शकतो. परिणामी, नागरिक महामार्ग थेट ओलांडण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू शकते.
याशिवाय, या ठिकाणी पुणे मेट्रोचे काम प्रस्तावित असून भविष्यात मेट्रो स्थानक देखील या परिसरात उभारले जाणार आहे. त्यामुळे हा पादचारी मार्ग भविष्यातील वाहतूक व्यवस्थेशी सुसंगत असावा. मेट्रो स्थानकाशी थेट जोडणी असलेला पूल, लिफ्ट किंवा एस्केलेटरची सुविधा आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ पर्याय असणे गरजेचे आहे. आपण तातडीने या पुलाच्या आराखड्याचा पुनर्विचार करून प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. अन्यथा, स्थानिक नागरिकांच्या वतीने आम्हाला जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक मा. संजय कदम यांना नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने पत्राद्वारे देण्यात आला.