बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणाला पुढे जातीयवादाचा रंग मिळाला. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं लावून धरला. बीड जिल्ह्याच्या पोलीस दलातील बिंदू नामावलीचा मुद्दा धस यांनीच उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला. जिल्ह्यातील पोलीस दलात एकाच जातीचं वर्चस्व असल्याचं धस यांनी सांगितलं होतं. पोलीस दलातील अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतील असल्याचा विषयदेखील धस यांनीच समोर आणला.

अधिक वाचा  टीम इंडिया अपराजित ‘चॅम्पियन्स’, न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात, 25 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता

बीड पोलीस दलातील जातीवादाचा विषय ताजा असताना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये पोलिसांच्या नेमप्लेटवर केवळ नाव असेल, आडनाव नाही, असा निर्णय काँवत यांनी घेतला आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांवर देखील जातीवादीचे आरोप झाले. त्यानंतर बीड पोलीस अधीक्षकांनी हे पाऊल उचललं आहे. नेमप्लेटवरील आडनाव काढून टाकल्यानं कोणता कर्मचारी कुठल्या जातीचा आहे हे लक्षात येणार नाही, हा यामागचा हेतू आहे.

खाकी घातल्यानंतर जिल्ह्यामध्ये काम करताना आम्ही कुठलाही भेदभाव करत नाहीत. कुठली जात आहे, कुठला पक्ष आहे, हे आम्ही पाहत नाहीत कायद्याप्रमाणे आम्ही काम करतो, असं पोलीस अधीक्षक काँवत यांनी सांगितलं. ‘आमच्या विभागातील कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची आडनावं बघून लोक जातीबद्दल चर्चा करतात. आमची नेमप्लेट पाहून जनता आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही चांगलं काम करत असूही नेमप्लेटवरील आडनाव पाहून त्यावरुन जात शोधली जाते. त्यामुळे खाकी गणवेशावरील नेमप्लेटमधून आम्ही आडनाव काढून टाकलं आहे. फक्त नाव ठेवलेलं आहे. यामुळे हा पोलीस या जातीचा आहे अशी शंका आता घेता येणार नाही,’ अशा शब्दांत काँवत यांनी नेमप्लेटवरुन आडनाव काढून टाकण्यामागील आपला हेतू सांगितला.

अधिक वाचा  ‘राष्ट्रवादी’चा स्ट्राईक रेट जास्त बक्षीस म्हणून फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीला हे ‘मानाचंपान’ हे गिफ्ट मिळणार

सर्व जनता आम्हाला समान आहे. आम्ही कुठला पक्ष, जात पाहत नाही. कायद्याप्रमाणे आम्ही काम करतो. त्यामुळे आम्ही सर्व पोलिसांना पहिलं नाव असलेली नेम प्लेट दिलेली आहे. पोलिसाचं आडनाव बघून तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचं मत परिवर्तन होऊ नये यासाठी आम्ही केवळ पहिलं नाव असलेली नेम प्लेट दिली आहे, अशी माहिती काँवत यांनी दिली. आम्ही निष्पक्षपणे लोकांना सेवा देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.