स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दिवशी दत्तात्रय गाडे याच्याकडे जो मोबाइल होता, त्याचा शोध घेण्यात येत आहे. हा मोबाइल अद्यापही सापडलेला नाही. घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. दरम्यान, आरोपी गाडे याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात गाडे याला अटक करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी (दि. १२) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. पोलिस कोठडीदरम्यान गाडे याला या गुन्ह्यातील घटनास्थळांवर नेण्यात आले होते. तो ज्या शेतात लपून बसला होता, त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आला. या दरम्यान तो ज्यांना-ज्यांना भेटला, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. गाडे याला न्यायालयात आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने बुधवारी परिसरात चोख बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता.

अधिक वाचा  महापालिकेची ५ कोटीची निविदा मर्जीतील ठेकेदाराला न दिल्याच्या रागातून माजी नगरसेवकाची कामगारांना मारहाण; राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडे याची न्यायालयीन कोठडी मागण्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर केला. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला कपडे पुरविण्याची मागणी केली. आरोपीचे वकील सुमीत पोटे यांनी न्यायालयाकडे न्यायालयातच आरोपीशी बोलण्याची संधी मिळण्याची मागणी केली. गाडे याच्या वतीने ॲड. वाजेद खान-बिडकर यांनीदेखील बाजू मांडली, तर मूळ फिर्यादी यांच्यावतीने ॲड. असीम सरोदे यांनी बाजू मांडली.

आतापर्यंत तपासात काय झाले?

– घटनास्थळांचा पंचनामा

– तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला

– प्रत्यक्षदर्शी इतर साक्षीदारांकडे चौकशी

– आरोपी व तरुणीचे कपडे जप्त

– सायंटिफिक विश्लेषणासाठी कपडे पाठवले

अधिक वाचा  “रोहितची खेळी… सलामी शतकी भागीदारी…. स्फोटक सुरुवात” न्यूझीलंड कर्णधार सँटनर हिटनमॅनच नाव घेत काय म्हणाला?

– आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले

– गाडे याच्यावर एकूण सात गुन्हे दाखल