वाहतूक पोलिसांनी कर्णकर्कश आवाज काढणार्‍या सायलेन्सरचा वापर करणार्‍या बुलेटचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करुन फटाक्यांसारखे आवाज काढणारे सायलेन्सर जप्त केले. येरवड्यातील वाहतूक शाखेच्या कार्यालयात जप्त केलेल्या १ हजार ७६८ सायलेन्सरवर बुलडोझर चालविण्यात आला. येरवडा येथील वाहतूक विभागाच्या मैदानात ही कारवाई करण्यात आली.

रात्री अपरात्री शहर, तसेच उपनगरात भरधाव वेगाने बुलेटचालक तरूण जातात. बूलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार (मॉडिफाय) करण्यात आल्याने त्यातून फटाक्यासारखा आवाज निघतो. या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांचे सायलेन्सर जप्त केले. कर्कश सायलेन्सर नष्ट करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या १ हजार 768 सायलेन्सरवर ‘बुलडोझर’ चालवून ते नष्ट केले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पोलीस निरीक्षक सुनील गवळी आणि वाहतूक शाखेतील अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  काँग्रेसच्या बड्या नेत्यावर गोळीबार, हल्लेखोरांकडून तब्बल १३ राउंड फायर; राजकारणात मोठी खळबळ

कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणार्‍या दुचाकीस्वार, बुलेटचालकांविरुद्ध यापुढील काळात तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त अमोल झेडे यांनी दिला आहे. तसेच सायलेन्सर विक्री करणारे व्यावसायिक, तसेच सायलेन्सर बसवून देणारे गॅरेजचालकांविरुद्धही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.