योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव हे घोड्याशी शर्यत लावताना दिसत असून तो व्हिडीओ शेअर होताच प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये बाबा रामदेव यांच्या फिटनेसची चर्चा सुरू झाी. मात्र याच व्हिडीओवर एका अमेरिकन अब्जाधीशाने कमेंट केली, ती वाचून सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. बाबा रामदेव यांच्या अँटी-एजिंग दाव्यांवर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या एक्स प्रोफाईलवरून ब्लॉक केल्याचा दावा या अमेरिकन व्यावसायिकाने केला आहे.
बाबा रामदेव यांनी पोस्ट केला व्हिडीओ
मंगळवारी बाबा रामदेव यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते घोड्याशी शर्यत लावत पळताना दिसत आहेत. त्या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनही लिहीली होती, “जर तुम्हाला घोड्याप्रमाणे वेगाने धावण्याची ताकद, मजबूत इम्युनिटी (प्रतिकारशक्ती), अँटी-एंजिग आणि शक्ती हवी असेल, तर गोल्डन शिलाजीत आणि इम्युनोग्रिट गोल्ड खा.” असे त्यांनी त्यातच नमूदल केलं होतं. गोल्ड शिलाजीत आणि इम्युनोग्रिट गोल्ड ही पतंजलीची उत्पादनं आहेत, पतंजलीची स्थापना रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी 2006 मध्ये केली होती.
अमेरिकन अब्जाधीशाचे सवाल
मात्र बाबा राम देव यांच्या व्हिडीओतील या दाव्यांवर अमेरिकन आणि बायोहॅकर ब्रायन जॉन्सन यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. अमेरिकन व्यावसायिकाने बाबा रामदेव यांच्या अँटी-एजिंग दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारतातील वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. ब्रायन जॉन्सन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “सध्या हरिद्वारमधील हवेची गुणवत्ता PM 2.5 36 µg/m³ आहे, जी दिवसाला 1.6 सिगारेट ओढण्याइतकी आहे.” एवढंच नव्हे तर “अशा प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने हृदयविकाराचा धोका 40-50% वाढतो, फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका तिप्पट होतो आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. हे सर्व तुमचे आयुष्य 7 वर्षांपर्यंत कमी करू शकते” असा दावाही त्यांनी पुढे केला.
मात्र आपण बाबा रामदेव यांच्या पोस्टवर ही कमेंट केल्यानंतर त्यांनी मला ब्लॉक केल्याचा दावा या अब्जाधीशाने केला आहे. ब्रायन जॉन्सन याने काही काळापूर्वीच निखील कामथ यांच्या पॉडकास्ट दरम्यान भारतातील हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारतातील खराब हवेमुळे त्याला आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्याने त्याने पॉडकास्ट मध्येच सोडले होते.