‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. या शोचा कर्ताधर्ता कॉमेडियन समय रैना, रणवीर अलाहबादिया आणि इतर परीक्षकांविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले आहेत. सध्या समय रैना त्याच्या शोजमुळे परदेशात आहे. कॅनडामधील एडमंटनमधील मायर होरोविट्झ थिएटरमध्ये त्याचा लाइव्ह शो पार पडला. या शोला उपस्थित राहिलेल्या एका चाहत्याने सोशल मीडियावर समयबद्दल पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर समयनेही शोवरून सुरू असलेल्या वादावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
शुभम दत्ता नावाच्या एका चाहत्याने फेसबुकवर समयच्या शोबद्दल पोस्ट लिहिली आहे. यात त्याने त्याचा अनुभव सांगितला आहे. ‘द शो मस्ट गो ऑन.. समय रैनाचा शो पाहिल्यानंतर अखेर मला या वाक्याचा खरा अर्थ समजला आहे. या शोला आजच्या पिढीतील ज्यांना ‘बिघडलेले’ म्हटलं जातं, असे जवळपास सातशे सदस्य उपस्थित होते. ते बेंबीच्या देठापासून समयच्या नावाची घोषणा करत होते. या सर्वांसमोर उभा राहिलेल्या समय रैनाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं’, असं त्याने लिहिलं.
समय रैनाने त्याच्या शोची सुरुवात प्रेक्षकांचे आभार मानत केली. याविषयी शुभमने लिहिलं, ‘प्रचंड मानसिक दबावाखाली असलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, थकलेला चेहरा, काळ्या रंगाची हुडी घालून आलेला 25 वर्षांचा तो मुलगा प्रेक्षकांसमोर आला आणि त्याने माइकमध्ये सर्वांत आधी म्हटलं, माझ्या वकिलाची फी भरल्याबद्दल धन्यवाद.’ जेव्हा शो सुरू होतो, तेव्हा प्रेक्षकांमधील एक तरुण समयबद्दल विनोद करतो. तेव्हा रणवीर अलाहबादियाच्या वादाचा संदर्भ देऊन समय त्याला त्याच्याच अंदाजात प्रत्युत्तर देतो.
“या शोमध्ये अशा बऱ्याच संधी येतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप काही हास्यास्पद बोलू शकतो. पण तेव्हा ‘बीअर बायसेप्स’ला (रणवीर अलाहबादिया) आठवा भावांनो”, असं समय म्हणतो. रणवीरच्या अश्लील टिप्पणीमुळे समय आणि त्याच्या शोविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. देशभरात यावरून मोठा वाद सुरू असतानाही समयने दोन तासांपर्यंत प्रेक्षकांना हसवल्याबद्दल चाहत्याने त्याच्या पोस्टमध्ये खूप कौतुक केलं आहे.
‘आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक काळातून जात असतानाही या माणसाने त्याच्या कॉमेडिने प्रेक्षकांना दोन तासांपर्यंत हसवलं. त्यानंतर शो संपताना तो म्हणाला, “शायद समय खराब चल रहा है मेरा, पर याद रखना दोस्तों, मैं समय हूँ”, (कदाचित माझी वेळ वाईट सुरू आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, मीच वेळ आहे.)