“छावा” चित्रपटात दर्शवलेल्या घटनांनुसार, कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन गद्दार होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून दिलं. यामुळे, मुगलांना संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळालं. त्यानंतर या गद्दारांचं काय झालं, हा एक महत्त्वाचं प्रश्न पडला असेल. त्यांच्या गद्दारीसाठी त्यांना कोणतंही वतन मिळालं का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोडच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता. तसेच, पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जिऊबाई म्हणजे येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला. त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला.
त्यानंतर, पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितले. मात्र, हिंदवी स्वराज्यात वतनदारीची पद्धत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता. त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नाही.
संभाजी महाराजांविरोधात कट
१६८२ मध्ये संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला. त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांना मदत केली. पण त्यांचा वतनाचा हट्ट कायम होता. परंतु, पुढे कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला. गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते.
गणोजी आणि कान्होजी यांनी मिळून मोठा कट रचला. त्यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवणे आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणे असा होता. परंतु, संभाजी महाराजांना याची कल्पना मिळाली आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक शिर्के घराण्यातील सदस्य मारले गेले.
शिर्के आणि कवी कलश यांच्यातील संघर्ष
संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यात तणाव निर्माण झाला. शिर्केंनी कवी कलशांवर दोषारोप ठेवले आणि संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली. त्यामुळे शिर्के कुटुंबाने उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला.
संभाजी महाराजांचा पकडण्यात शिर्केंचा हात
गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकर्बखानाला आंबाघाटाची वाट दाखवली. त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबाच्या सैन्याला कळवले. परिणामी, मुघल सैन्याने संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले.
गद्दारांना मिळालेली बक्षिसे
संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना पाच हजारी मनसबदारी बहाल केली. शिर्के कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागा मिळाली होती.
गणोजी आणि कान्होजी यांचा पुढील इतिहास
१६९७ मध्ये झुल्फिकार खानने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडकवले. त्यावेळीही गणोजी शिर्के मुघल सैन्यात होते. त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले. शेवटी, खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळ वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांना सुटका करण्यास मदत केली.
गद्दारांचा शेवट
औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीत वाढ केली. मात्र, पुढील इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही. त्यांचा मृत्यू कसा झाला, याची ठोस माहिती उपलब्ध नाही.
गद्दारीनंतर शिर्के कुटुंबाचे भविष्य
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळले. त्या वेळी शिर्के घराण्याने पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले. मात्र, त्यांच्या गद्दारीची खूण कधीही पुसली गेली नाही.
गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याशी केलेला विश्वासघात इतिहासात काळा डाग म्हणून कायम राहील. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, कारण त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला.