सध्या ठाकरे गटातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मुंबईतून विलेपार्ल्याचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे हे येत्या 20 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची बातमी येताच आता ठाकरे गट सक्रीय झाला आहे. जनावळे यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी बोलावलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल परब यांची तक्रार करणार असल्याच जनावळे यांनी सांगितलं. “विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे अनिल परब, संजय राऊत कोण?” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी ठाकरे गटाच्या विलेपार्ले उपविभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला.
“संजय राऊत आणि अनिल परब हे विलेपार्लेबाबत निर्णय घेणारे कोण? माझ्या शिवसेनाप्रमुखांची विलेपार्ले विधानसभा यांनी आम आदमी पार्टीला दिली. त्यावेळी आम्ही उद्धव ठाकरेंना भेटून ठामपणे सांगितलं झाडूचा प्रचार करायला आमचा विरोध आहे. मशालकडे ही विधानसभा घ्या. लढून जिंकायच आहे” असं जितेंद्र जनावळे म्हणाले.
मनातली खदखद बाहेर काढताना काय म्हणाले?
“मला विलेपार्ले लढवायची आहे. मला तो वॉर्ड भाजपकडून काढून शिवसेनेला द्यायचा आहे. ही माझी तडफ होती. पण माझी तडफ लक्षात घेतली नाही. सहावर्ष मला त्या विधानसभेतून काढून बाहेर ठेवलं. तुमचे मनसुबे काय? शिवसेनेला जिंकवायच की, भाजपला? याचा विचार झाला पाहिजे” असं जितेंद्र जनावळे म्हणाले. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले असताना त्यांनी मनातली ही खदखद बोलून दाखवली. ठाकरे गटातून अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
मातोश्रीसमोर का डोकं टेकलं?
उद्धव ठाकरेंना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांनी मातोश्रीसमोर डोकं टेकवून नमस्कार केला. या बद्दल जनावळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “मंदिर आहे, मंदिरात जाताना आणि मंदिरातून येताना मंदिराच्या उंबरठ्यावर माणूस झुकतो. आज मी त्या ठिकाणी पाया पडलो. आता हे काय समजायचय ते समजून जा. साहेबांच्या बोलण्यातून विभागाच्या बाबतीत काही निर्णय होईल तसं दिसत नाही. साहेब काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत असं वाटत नाही”